सावित्रीबाई फुले
भारतातील पहिली स्त्री शिक्षिका, भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ तसेच कवीयित्री असलेल्या सावित्रीबाई फुले यांना भारतीय स्त्रीवादाची जननी मानली जाते. पती ज्योतिराव फुले यांच्यासमवेत त्यांनी भारतातील महिलांचे हक्क मिळवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. जाती आणि लिंगांवर आधारित लोकांवरील भेदभाव आणि अन्यायकारक वागणूक दूर करण्याचे काम त्यांनी केले. महाराष्ट्रातील समाजसुधारणेच्या चळवळीत त्यांना एक महत्त्वाचे स्थान आहे.
सावित्रीबाई फ़ुले व ज्योतिराव फुले यांनी 1884 मध्ये पुण्यातील भिडे वाडा येथे पहिली भारतीय मुलींची शाळा सुरू केली. महिलांसाठी शिक्षणाचे द्वार उघडणाऱ्या अशा या महान क्रांतिजोती सावित्रीबाई फुले यांचे प्रेरणादायी जीवनप्रवास जाणून घेऊया.
Savitribai Phule Mahiti |
◆ सुरुवातूचे जीवन
सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. नायगाव हे शिरवळपासून पाच किलोमीटर आणि पुण्यापासून सुमारे 50 किलोमीटर अंतरावर होते. सावित्रीबाई फुले या लक्ष्मीबाई आणि खंडोजी नेवासे पाटील यांची मोठी कन्या होती, ते माळी समाजातील होते. सावित्रीबाईनां कोणत्याही शाळेत पाठविण्याचा प्रश्नच नव्हता कारण त्या काळात वंचित आणि मागासवर्गीय मुलांना शाळेत शिकण्याचा अधिकारच नव्हता.
सावित्रीबाई फुले यांचा विवाह 1840 मध्ये ज्योतिराव फुले यांच्याशी झाला. त्या काळी बालविवाहाची परंपरा असल्याने लग्नाच्या वेळी सावित्रीबाईंचे वय नऊ, तर जोतीरावांचे वय तेरा वर्ष होते. जोतीराव फुले हे विचारक, लेखक तसेच समाजसुधारक होते. सावित्रीबाई आणि जोतीराव यांना स्वतःची मुले नव्हती. असे म्हटले जाते की त्यांनी यशवंतराव या ब्राह्मण विधवेला जन्मलेल्या मुलाला दत्तक घेतले. तथापि, याचा कोणताही मूळ पुरावा नाही.
◆ शिक्षण (Savitribai Phule Information in Marathi)
पूर्वी स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नसल्याने लग्नाच्या आधी त्या शिक्षणापासून वंचित राहिल्या होत्या. जोतीराव फुले पुरोगामी विचारांचे असल्याने त्यांनी घरातच सावित्रीबाईनां शिकवण्यास सुरुवात केली. त्यावेळी स्त्रीने शिक्षण मिळवणे हा एक प्रकारचा पाप मानला जात असे. परिणामी ज्योतिरावांचा विरोध सुरू झाला. पण त्यांनी हार मानली नाही आणि सावित्रीबाईनां शिक्षण देण्यास सुरू ठेवले.
जोतीराव यांना लहानपणापासून मातृप्रेम लाभले नाही. त्यांची मावस आत्या सगुणाबाई यांनीच त्यांचा सांभाळ केला होता. सगुणाबाई एका इंग्रज अधिकाऱ्याच्या मुलाच्या दाई म्हणून काम करायच्या. त्यांना इंग्रजी कळायचे व बोलताही यायचे.
सावित्रीबाई आणि सगुणाबाई दुपारी ज्योतिरावांना भोजन देण्यासाठी शेतात जात असत. ज्योतिरावांनी शेताच्या मागील बाजूस आंब्याच्या झाडाखाली आंब्याची पातळ फांदीचे पेन बनवून त्या दोघींनाही जमीवर अक्षराची ओळख करुन दिली. कोणाला माहीत होते, की जमिनीवरील धुळीवर कोरलेल्या अक्षरांतून एक तेजस्विनी अग्नि जन्माला येईल.
अहमदनगरमध्ये अमेरिकन मिशनरीच्या सहकार्याने महिलाची शाळा सुरू करण्याची कल्पना ज्योतीरावांनी वडिलांना सांगताच त्याच्या वडिलांनी त्यांना व सावित्रीबाईनां घरातून बाहेर काढले होते.
● सावित्रीबाई फुले यांचे प्रेरणास्थान
1840 मध्ये ब्रिटिश अधिकाऱ्याची पत्नी मिस्सेलने पुण्यातील छाबिलदासच्या वाड्यात मुलींसाठी सामान्य शाळा सुरू केली, सावित्रीही तिथेच शिकू लागली. शिक्षण घेत असताना, सावित्रीने गुलामगिरी विरोधात काम करणाऱ्या थॉमस क्लार्क्सन यांचे जीवनचरित्र वाचले, ज्यात अमेरिकेच्या आफ्रिकन गुलामांच्या जीवनाची संघर्षमय शोककथा छापली गेली होती. सावित्रीबाईनां समजले की शिक्षण हे परिवर्तनाचे एक मजबूत साधन आहे कारण अशिक्षित व्यक्तीनां आपल्या हक्का बद्दल जाणीव नसते त्यामुळे ते आपल्या हक्क प्राप्तीसाठी संघर्ष करू शकत नाहीत. या पुस्तकामुळे त्यांच्यात शिकण्याची तीव्र इच्छाच जागृत केली नाही तर समाजातील मुलींना शिक्षित करण्याचे स्वप्न देखील दिले.
◆ मुलींची पहिली शाळा
महिलांना चुली आणि मुले पर्यंतच सिमीत न ठेवता मुलींना शिक्षित बनवण्यासाठी, 1 जानेवारी 1848 रोजी सावित्रीबाई फुले यांनी ज्योतिबासमवेत विविध जातीच्या 9 मुलीना घेऊन पुण्यातील भिडेवाडी येथे मुलींसाठी पहिली शाळा स्थापन केली. जिथे सगुणाबाई देखील शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. या शाळेत मुलींनी गणित, व्याकरण, भूगोल, भारतासह युरोप आणि आशिया खंडांचे नकाशे, मराठ्यांचा इतिहास, धोरण व बाल आकलनाचे विषय या सर्वांचा अभ्यास करून देशाच्या शैक्षणिक विकासात आपले मोलाचे योगदान दिले. सदाशिव गोवंडे यांनी शाळेसाठी पुस्तके व्यवस्थापित केली. त्यानंतर काही महिन्यातच 15 मे 1848 रोजी दलित वसाहतीत दलित मुला-मुलींसाठी आणखी एक शाळा सुरू करण्यात आली. एका वर्षातच त्यांनी 5 शाळा स्थापन केल्या. त्या केवळ महिला आणि दलितांच्या शिक्षण आणि आर्थिक विकासापुरत्या मर्यादीत न राहता त्यांना अल्पसंख्याक समुदायाच्या शैक्षणिक स्थितीबद्दलही काळजी होती.
सावित्रीबाई यांनी अल्पसंख्याकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात जोडण्यासाठी आपल्या शालेय विद्यार्थिनी फातिमा शेख यांना पहिली मुस्लिम महिला शिक्षिका होण्याचा मान दिला पुढे त्या देशातील नामांकित सामाजिक कार्यकर्त्या बनल्या. याच प्रकारे कोणतीही खाजगी मदत न घेता 1 जानेवारी 1848 ते 15 मार्च 1852 या कालावधीत सावित्रीबाई यांनी ज्योतिबासह पुण्यामध्ये आणि जवळपास 18 शाळा स्थापन केले. जिथे शेकडो मुलांनी शिक्षण घेऊन आपले जीवनमान सुधारले.
सावित्रीबाई फुले यांना मूल नव्हते, शाळेतील मुलेच त्यांची मुले होती. जेव्हा सावित्रीबाई आपल्या शाळांमध्ये मुलांना शिकवण्यासाठी जात असत, तेव्हा सनातनी उच्च वर्णीय "धर्म बुडाला... जग बुडणार... कली आला..." असे सांगू लागले. वैदिक सनातन्यांनी विरोध केला. अंगावर शेण फेकले, कचरा, घाण टाकत तर काही उन्मत्तांनी अंगावर हात टाकण्याची भाषा केली. तरीही सावित्रीबाईंनी कधीही त्यांना त्यांच्या ध्येयापासून भटकु दिले नाही.
अनेक संघर्ष करत सावित्रीबाईंचा शिक्षणप्रसाराचा हा उपक्रम चालूच राहिला. त्या आपल्याबरोबर बॅगेत अतिरिक्त साडी घेऊन जात असत आणि शाळेत पोहोचल्यावर विरोधकांनी टाकलेली घाण साफ करून दुसरी साडी घालत असे. त्यांनी निवडलेला हा मार्ग काट्या कुट्यांनी भरलेला होता. परंतु त्या डगमगल्या नाहीत, त्यांना महिलांच्या शिक्षणासाठी व त्यांच्या हक्कांसाठी काहीतरी करता आले याचा आनंद वाटत असे.
● बाल हत्या प्रतिबंधक गृह स्थापना
त्यावेळी समाजात बालविवाहाच्या प्रथेमुळे स्त्रिया तरुण वयातच मोठ्या संख्येने विधवा होत असत. समाजात विधवा महिलेला विवाह करण्यास मनाई होती. यामुळे विधवा स्त्रिया अपमानित जीवन जगत असत तसेच हिंसाचार, छळ आणि बलात्काराचाही बळी होत असत. बलात्कारामुळे गर्भवती झाल्यामुळे समाजात इज्जत मिळणार नाही तसेच सामाजिक भीतीपोटी महिलांचे आत्महत्यांचे प्रमाण वाढत होते. स्त्रियांवर होणारा हा अन्याय सावित्रीबाई फुले यांना सहन होऊ शकला नाही. 28 जानेवारी 1853 रोजी गर्भवती महिलांसाठी निवारा व संरक्षणासाठी ज्योतिबाचा मित्र उस्मान शेख यांच्या घरी 'बाळ हत्या प्रतिबंधक गृह'ची स्थापन केली आणि पाळणाघरही सुरू केले.
● इतर सामाजिक कार्य
सावित्रीबाईंनी नाभिक समाजाशी संवाद साधून विधवा महिलांच्या केशवपन विरूद्ध आंदोलन केले. पितृसत्तावादी आणि स्त्री-विरोधी रूढीपरंपरेविरुद्ध आवाज उठविला आणि महिलांना मानवी सन्मानाने जगण्याची संधी दिली. 1892 मध्ये महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळावे म्हणून त्यांनी महिला सेवा मंडळ स्थापन केले. ज्यामध्ये महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणे सुरू केले जेणेकरुन महिला आत्मनिर्भर होऊ शकतील.
सावित्रीबाई भारताची पहिली महिला शिक्षिका, समाजसुधारक आणि मराठी कवीयत्री होती. विधवांचे पुनर्विवाह, अस्पृश्यता निर्मूलन, महिलांना शोषणातून मुक्त करणे तसेच दलित महिलांना शिक्षित करणे यासारख्या महत्वाच्या कार्ये त्यांनी केले. जातीवाद, लैंगिकता आणि वर्णभेदाविरूद्ध तीव्र लढा दिला आणि समाजात आदरणीय स्थान निर्माण करून महिलांसाठी सकारात्मक वातावरण निर्माण केले. सावित्रीबाईंच्या जीवनाचा प्रत्येक क्षण महिला आणि मागासवर्गीयांच्या उत्कर्षास समर्पित होता.
◆ सावित्रीबाई फुले यांचे निधन
1897 मध्ये पुण्यामध्ये प्लेग नावाच्या साथीच्या रोगाने धुमाकूळ घातला होता. लोक पुणे सोडून जात होते. लोकांनी सावित्रीबाईंना पुणे सोडण्याची विनंती केली परंतु त्या तयार झाल्या नाही. यातून उद्भवणारे हाल ओळखून सावित्रीबाईंनी प्लेगपीडितांसाठी पुण्याजवळ असलेल्या ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला. एक दिवस एका प्लेग ग्रस्त मुलाला आश्रमात आणण्याची कोणतीही व्यवस्था होऊ शकली नाही, त्यामुळे त्यांनी स्वतः त्या मुलाला खांद्यावर घेऊन आश्रमात आणले. आपल्या स्वतः च्या प्रकृतीचीही पर्वा न करता प्लेगची लागण झालेल्यांसाठी काम केले. दुर्दैवाने त्या स्वतःच प्लेगच्या भीषण रोगाच्या बळी ठरल्या आणि 10 मार्च 1897 रोजी पुण्यात त्यांचे निधन झाले. सावित्रीबाई आज आपल्यात नसल्या तरीही त्यांचे कार्य आपल्याला प्रेरणा देत राहतील.
◆ सन्मान
• सावित्रीबाईंच्या सामजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून 1995 पासुन 3 जानेवारी हा सावित्रीबाईचा जन्मदिन हा “बालिकादिन” म्हणून साजरा केला जातो.
• 10 मार्च 1998 रोजी भारत सरकारने सावित्रीबाई यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक योगदानाचे महत्त्व अधोरेखित करीत दोन रुपयाचे डाकटिकीत जारी केले.
• 2015 मध्ये, महाराष्ट्र सरकारने पुणे विद्यापीठाचे नाम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे ठेवले आणि त्यांची स्मृती कायम केली.
• 3 जानेवारी 2017 रोजी सावित्रीबाई फुले यांच्या 186 व्या जन्मदिनानिमीत्त त्यांचे 'गूगल' 'डूडल' प्रसिद्ध करुन गुगलने त्यांना अभिवादन केले.
सावित्रीबाई फुले यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास आवडल्यास नक्की शेयर करा...
✒️ आपल्या भाषेत मराठी भाषेत 🇮🇳