adsense

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनचरित्र : Dr. Babasaheb Ambedkar Biography in Marathi

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर 

Dr. Babasaheb Ambedkar Mahiti


डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ नाव भीमराव होते. त्यांचे वडील रामजी मालोजीराव सकपाळ महू येथे मेजर सुभेदार पदावर सैनिकी अधिकारी होते. 14 एप्रिल 1891 रोजी दुपारी 12 वाजता रामजी सुभेदार आपल्या कर्तव्यावर असताना भीमराव यांचा जन्म झाला. रामजी व भीमाबाई या दांपत्यांना सन 1891 पर्यंत चौदा अपत्य झाली होती. त्यापैकी गंगा, रमा, मंजुळा व तुळसा या चार मुली जीवंत राहिल्या होत्या. मुलांपैकी बाळाराम, आनंदराव व भीमराव (भिवा) ही तीन मुले जिवंत होती. भीमराव सर्वात लहान व चौदावे अपत्य होते.


◆ शिक्षण


1894 मध्ये सुभेदार रामजी सकपाळ इंग्रजी सैन्यातील मुख्याध्यापक पदाच्या नोकरीवरुन निवृत्त झाले आणि महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी दापोली येथे परिवारासह राहू लागले. भीमराव वयाने लहान असल्यामुळे कॅम्प दापोली येथील शाळेत त्यास प्रवेश मिळाला नाही व घरीच भीमरावास अक्षर ओळख करून द्यावी लागली. इ.स. 1896 मध्ये रामजींनी आपल्या कुटुंबासह दापोली सोडले व ते सातारा येथे जाउन राहिले. यावेळी भीमरावाचे वय पाच वर्षाचे होते. रामजींनी इ.स. 1896 च्या नोव्हेंबर महिन्यात सातारा येथील कॅम्प स्कूल या मराठी शाळेमध्ये भीमरावाचे नाव दाखल केले. त्यांच्या या स्थानांतरानंतर थोड्या कालावधी मधे मस्तक शूल या आजाराने आंबेडकरांच्या आई भीमाबाईंचे निधन झाले, त्यावेळी आंबेडकर ५ वर्षाचे होते. त्यानंतर भीमासह व अन्य मुलांची संगोपन त्यांच्या आत्या मीराबाईंनी कठीण परिस्थितीत केले.

बाळ भीमराव यांचे प्राथमिक शिक्षण दापोली व सातारा येथे झाले. डिसेंबर 1904 मध्ये रामजी सकपाळ सहपरिवार मुंबईला आले व तेथील लोअर परळ भागातील डबक चाळ परिसरात एका 10 बाय 20 च्या खोलीत राहू लागले. शाळेत असतानाच 1906 मध्ये 14-15 वर्षीय भीमरावांचे लग्न दापोलीच्या भिकू वलंगकर यांची 9 वर्षीय कन्या रमाबाई यांच्याशी झाले. 1907 मध्ये त्यांनी मुंबईतील एल्फिन्स्टन स्कूलमधून मॅट्रिकची परीक्षा दिली. या प्रसंगी त्यांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला  होता आणि भेट म्हणून त्यांचे शिक्षक कृष्णाजी अर्जुन केळुसकर यांनी त्यांना 'बुद्ध चरित्र' हा स्वलिखित पुस्तक भेट दिले. हायस्कूलमधील अनेक शिक्षक त्यांच्याशी तिरस्काराने वागत असत. आंबेडकर हे आपल्या विद्यार्थी जीवनात दररोज 18 तास अभ्यास करत असत. बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड यांची शिष्यवृत्ती प्राप्त झाल्यानंतर भीमराव यांनी 1912 मध्ये मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र विषय घेऊन पदवी संपादन केली. संस्कृत विषय घेण्यास विरोध असल्यामुळे ते पर्शियन विषय घेऊन उत्तीर्ण झाले आणि बडोदा संस्थानात नोकरीवर रुजू झाले. याच वर्षी 12 जानेवारी 1912 रोजी त्यांना पहिला मुलगा यशवंत झाला. त्याच सुमारात 2 फेब्रुवारी 1913 रोजी मुंबईमध्ये त्यांचे वडील रामजींचे आजाराने निधन झाले.


◆ कोलंबिया विद्यापीठ


बी.ए. नंतर एम.ए. अभ्यासासाठी बडोद्याचे राजे सयाजीराव गायकवाड यांची पुन्हा शिष्यवृत्ती मिळवून अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात प्रवेश केला. 1915 मध्ये त्यांनी पदव्युत्तर पदवी परीक्षा दिली. यासाठी त्यांनी ‘प्राचीन भारतीय व्यापार’ हे संशोधन लिहिले. त्यानंतर 1916 मध्ये त्यांनी अमेरिकेत कोलंबिया विद्यापीठातूनच पीएच.डी. पदवी मिळवली. त्यांचे पीएच.डी. मध्ये 'भारताचा राष्ट्रीय लाभांश: इतिहासात्मक आणि विश्लेषणात्मक अध्ययन' हा या संशोधनाचा विषय होता.


◆ लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स


कोलंबिया विद्यापीठात एम.ए. व पीएच.डी. या पदव्यांसाठी आंबेडकरांनी अर्थशास्त्राचा अभ्यास केला होता, त्यामुळे बी.एस्सी. ची परीक्षा न देता थेट एम.एस्सी. साठी प्रवेश मिळावा, अशी प्रा. कॅनन यांच्या शिफारशीसह असलेली विनंती लंडन विद्यापीठाने मान्य केली.

शिष्यवृत्ती  संपल्यावर त्यांना भारतात परत येणे आवश्यक होते. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स येथे त्यांनी एम.एससी. आणि डी.एससी आणि कायदा संस्थेत बार-एट-लॉ पदवीसाठी स्वतःची नोंदणी केली. परंतु त्यांच्या एक वर्ष शिष्यवृत्तीची कालमर्यादा संपल्यामुळे अभ्यास अर्धवट सोडून त्यांना भारतात परतावे लागले. लंडन सोडण्यापूर्वी आंबेडकरांनी पुढील चार वर्षांच्या कालमर्यादेत म्हणजे ऑक्टोबर 1917 ते सप्टेंबर 1921 पर्यंत कोणत्याही वेळी लंडन येऊन आपला अपूर्ण राहिलेला अभ्यास करण्यासाठी पुन्हा प्रवेश घ्यावा, अशी लंडन विद्यापीठाकडून परवानगी मिळवली होती. सर्वप्रथम, शिष्यवृत्तीच्या अटनुसार त्यांनी बडोदाच्या राजाच्या दरबारात लष्करी अधिकारी आणि आर्थिक सल्लागारांची जबाबदारी स्वीकारली. येथे आंबेडकर अस्पृश्य असल्याने आपल्या कार्यालयात अन्य सहकारी व कर्मचारी त्यांचा सतत अपमान करीत असत. संपूर्ण शहरात त्यांना भाड्याने घर देण्यास कोणीही तयार नसल्याच्या गंभीर समस्येमुळे काही काळानंतर ते मुंबईला परत आले. परळ येथे राहून डबक चाळ व श्रमिक कॉलनी येथे राहून त्यांनी अपूर्ण अभ्यास पूर्ण करण्यासाठी अर्धवेळ प्राध्यापकाची व वकिली करुन आपली पत्नी रमाबाई यांच्यासोबत जीवन व्यतीत केले. 


◆ अशिक्षित व गरीब लोकांना जागरूक करण्याचे काम 


1919 मध्ये डॉ. आंबेडकर यांनी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट बाबत राजकीय सुधारणांसाठी साऊथब्युरो कमिशन पुढे आपले विचार मांडले. यावेळी त्यांनी दलित व इतर मागासलेल्या समाजांसाठी वेगळे मतदान संघ व आरक्षण यांची मागणी केली. 1920 साली त्यांनी मुंबईत मूकनायक नावाचे वृत्तपत्र सुरू केले त्यावेळी शाहू महाराजांनी त्यांना 2000 रुपयेची आर्थीक मदत दिली. आंबेडकरांनी मागासवर्गीयांच्या उत्थानासाठी बहिष्कृत हितकारिणी सभा सुरू केली.


अशिक्षित आणि गरीब लोकांचे जनजागृती करण्यासाठी त्यांनी मूकनायक आणि बहिष्कृत भारत साप्ताहिक मासिकांचे संपादन केले. याच दरम्यान त्यांचा अपूर्ण अभ्यास पूर्ण करण्यासाठी ते लंडन आणि जर्मनी येथे गेले आणि एम.एससी., डी.एस.सी. आणि बॅरिस्टर या पदव्या प्राप्त केल्या. त्यांच्या एम.एस.सी. चा संशोधन विषय हा "भारतीय शाही अर्थव्यवस्थेचे प्रांतीय विकेंद्रीकरण" होता. तर डी.एससी पदवीचा विषय हा  'द प्रोब्लम ऑफ रुपी' (रुपयाचा प्रश्न) होता. इंग्लंडमध्ये शिकत असताना ज्या अभ्यासक्रमाला 8 वर्षे लागतात तो आंबेडकरांनी 2 वर्षे 3 महिण्यात यशस्वी तऱ्हेने पूर्ण केला होता. यासाठी त्यांना दररोज 24 तासांपैकी 21 तास अभ्यास करावा लागला होता.


◆ मानद उपाधी 


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 5 जून 1952 रोजी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून एल.एल.डी. आणि उस्मानिया विद्यापीठातून डी.लिट. ची मानद उपाधी देण्यात आली. 1955 मध्ये, काठमांडू, नेपाळ येथे झालेल्या जागतिक बौद्ध परिषदेत सहभागी बौद्ध भिक्खुंनी त्यांना 'बोधिसत्व' ही उपाधी प्रदान केली. त्यांना बीए, एमए, एमएससी, पीएचडी, बॅरिस्टर एट लॉ,  डीएससी, डी. लिट असे एकूण 32 मानद उपाध्या मिळाल्या आहेत. 2012 मध्ये, "द ग्रेटेस्ट इंडियन" नावाच्या सर्वेक्षणात आंबेडकरांची 'सर्वश्रेष्ठ भारतीय' म्हणून निवड करण्यात आली आहे.


◆ बाबासाहेबांचे योगदान:


भारतरत्न डॉ. बी. आर. आंबेडकरांनी आपल्या आयुष्याच्या 65 वर्षात विविध क्षेत्रात सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, साहित्यिक, औद्योगिक, घटनात्मक इत्यादी क्षेत्रात असंख्य कामे करून राष्ट्र उभारणीत महत्त्वपूर्ण योगदान दिले. 

त्यापैकी मुख्य आहेत: -


◆ सामाजिक आणि धार्मिक योगदान:


दलितांचे मंदिर प्रवेश, पिण्याचे पाणी, अस्पृश्यता, जातीवाद अश्या अनेक रुढी परंपरा सामाजिक रुढींचे निर्मूलन करण्यासाठी मनुस्मृति दहन (1927), महाड सत्याग्रह (वर्ष 1928), काळाराम मंदिर नाशिक सत्याग्रह (वर्ष 1930), येवला येथील धर्मांतराची घोषणा (वर्ष 1935) यांसारखे अनेक आंदोलने बाबासाहेबांनी केली.


दलित, शोषित, पीडित, वंचित व शेतकरी लोकांना जागे करण्यासाठी 1927 ते 1956 या कालावधीत त्यांनी मूक नायक, बहिष्कृत भारत, समता, जनता आणि प्रबुद्ध भारत अशी पाच साप्ताहिके आणि पाक्षिक नियतकालिकांचे संपादन केले.


बहिष्कृत हितकारिणी सभेच्या माध्यमातून सामाजिक व राजकीयदृष्ट्या तळागाळात फेकल्या गेलेल्यांना भारतीय समाजातील इतरांच्या बरोबर आणणे, अस्पृश्यांना समाजाबाहेर ठेऊन, त्यांना नागरी, धार्मिक वा राजकीय हक्क देण्यात आले नव्हते. त्यांच्या अधिकारांप्रती त्यांच्यामध्ये जागृती निर्माण करणे हा उद्देश होता. आंबेडकरांनी सायमन कमिशनकडे एक पत्र सादर केले व त्यात त्यांनी मागासवर्गीयांसाठी नामनिर्देशन तत्त्वावर जागा आरक्षित ठेवण्यासंबंधी मागणी केली. तसेच भूदल, नौदल व पोलीस खात्यात मागासवर्गीयांची भरती करण्यासंबंधीचीही त्यांनी मागणी केली होती. बहुजन हितकारणी सभेमार्फत अस्पृश्यांच्या कल्याणासाठी शाळा, वसतिगृहे व ग्रंथालये सुरू करण्यात आली.


जातपात तोडक मंडळाच्या (सन 1937) लाहोरच्या अधिवेशनासाठी तयार केलेल्या भाषणावरील जाती निर्मूलन हा त्यांचा ग्रंथ भारतीय धर्मग्रंथातील मिथॉलॉजि आणि अंधश्रद्धा यांपासून मुक्त करण्याचे काम केले. हिंदू विधेयक संहितेद्वारे घटस्फोटाची, मालमत्तेतील वारसा इत्यादी तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला.


1945 मध्ये त्यांनी आपल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून मुंबईतील सिद्धार्थ महाविद्यालय आणि औरंगाबादमध्ये मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. हिंदू धर्मात आपल्याला समतेची वागणूक देण्यात यावी यासाठी त्यांनी मोठा लढा दिला. शेवटी या सनात्यन्यांच्या अमानवी वृत्तीला कंटाळून बाबासाहेबांनी हिंदू धर्म त्यागाचा म्हणजेच धर्मांतराचा निर्णय घेतला.  आपल्या समाजातील मोठा जनसमुदाय या हिंदू धर्माचा त्याग करण्यास तयार आहे हे कळल्यावर, बाबासाहेबांवर दुसरी जबाबदारी येऊन पडली. ती म्हणजे पर्यायी धर्म निवडायचा तर कुठला? तर त्यासाठी त्यांनी सन 1935 च्या आपल्या धर्मांतरांच्या घोषणेनंतर 21 वर्षे जगातील विविध प्रमुख धर्मांचा अभ्यास केला होता. त्यानंतर त्यांचा कल मूळ भारतातील असलेला मानवतावादी व विज्ञानवादी धर्म म्हणून बौद्ध धम्माकडे वळला. बौद्धिक, वैज्ञानिक, मानवतावादी, करुणामय बौद्ध धर्मासह 14 ऑक्टोबर 1956 रोजी 5 लाख अनुयायांनसह नागपुरात बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि “द बुद्ध अँड हिज धम्म” या ग्रंथाच्या माध्यमातून भारतात बौद्ध धम्म पुनर्स्थापित केला.◆ आर्थिक, कृषी आणि प्रशासकीय योगदान


डॉ. आंबेडकर यांनी लिहिलेल्या 'द प्रोब्लम ऑफ रुपी' (रुपयाचा प्रश्न) या शोध प्रबंधांच्या आधारे - रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना 1 एप्रिल 1935 साली  झाली. भारताच्या मूलभूत आर्थिक विचारांचा पाया देखील आंबेडकरांच्या आर्थिक विचारांवर घातला गेला.


"भारतीय शाही अर्थव्यवस्थेचे प्रांतीय विकेंद्रीकरण" या त्यांच्या दुसर्‍या संशोधन कार्याच्या जोरावर देशात वित्त आयोगाची स्थापना झाली.


शेतीला शाश्‍वत पाणी पुरविण्यासाठी नदीच्या पाण्याचे नियोजन झाले पाहिजे. देशात घडणारे दुष्काळ हे मानवनिर्मित आहेत. दुष्काळ हटवायचा तर दुष्काळात पाण्याचे नियोजन करावे. जिरायती शेती, बागायती करण्याचे प्रयत्न वाढवावेत. शेती व शेतमजूर समृद्ध झाला तरच देश समृद्ध होईल, असे मौलिक विचार त्यांनी मांडले. पाण्यासंदर्भात केवळ विचार व्यक्त न करता त्यांनी ब्रिटिश सरकारला, नदीच्या खोर्‍यातील पाण्याच्या नियोजनाची योजना सादर केली. ही योजना ‘दामोदर खोरे परियोजना’ म्हणून ओळखली जाते. आपल्या शासनाने 1996 मध्ये कृष्णा, गोदावरी, तापी, नर्मदा अशी खोर्‍यांची विभागणी केली. यावरून डॉ. बाबासाहेब किती दूरदर्शी होते हे लक्षात येते.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांत महत्त्वाची संकल्पना मांडली ती ‘शेतीचे राष्ट्रीयकरण’ करण्याची. शासनाने शेतजमिनी ताब्यात घेऊन, त्या विकसित कराव्यात व अशा विकसित शेतजमिनी शेतकर्‍यांना काही अटींवर कसण्यासाठी द्याव्यात. हा एका अर्थाने सामुदायिक शेतीचाच प्रयोग होता. अशी शेती करण्यासाठी शासनाने अधिनियम बनवावेत. पीकपद्धती, पाणी उपलब्धता, बांधबंदिस्ती, उत्पादकता वाढ, साठवण व्यवस्था, शेतमालाची विक्री, शेतमालाचे भाव या संदर्भात स्पष्ट नियम करावेत. यामुळे कोणत्याही एकाच पिकाखाली मोठे क्षेत्र येऊन, शेतमालाच्या उपलब्धतेत विषमता येणार नाही. मागणी व पुरवठा या अर्थशास्त्रीय नियमानुसार, शेतमालाला रास्त भाव मिळतील. त्याचबरोबर अतिरिक्त उत्पादन टळून शेतमालाचे नुकसानही टळेल. आजही शेतकर्‍यांना शेतमालाला रास्त भाव मिळावा यासाठी शासनाशी झगडावे लागते. या पार्श्‍वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शेतीसाठी अधिनियम व कायदा असावा ही संकल्पना शेतकर्‍यांसाठी किती मोलाची आहे, हे अधोरेखित होते.


त्यांनी भारताच्या विकासासाठी मजबूत तांत्रिक संस्थेची नेटवर्क रचना सादर केली. जल व्यवस्थापन, विकास आणि नैसर्गिक संसाधनांचा अर्थपूर्ण मार्गाने देशाच्या सेवेत उपयोग होण्यासाठी त्यांनी प्रशस्त मार्ग निर्माण केला.


◆ संविधान आणि राष्ट्र निर्माण


स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय तत्त्वावर आधारित समाजरचना घडवण्यासाठी 2 वर्षे 11 महिने आणि 17 दिवस अहोरात्र मेहनत करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताची राज्यघटना लिहिली. तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांना 26 नोव्हेंबर 1949 रोजी सुपूर्द केली. सामाजिक, धार्मिक, आर्थिक, राजकीय, न्याय, विचार अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना याचे ‘स्वातंत्र्य’, दर्जाची आणि संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकात्मता आणि अखंडता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रस्थापित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून भारत एक सार्वभौम, समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा हक्क या संविधानाद्वारे सर्व भारतीयांस प्राप्त करून दिला आहे.


हिंदू कोड बिल (हिंदू सहिंता विधेयक) हे भारतातील स्त्रियांचा सशक्तीकरणासाठी एक पाऊल होते. आंबेडकरांनीनी 1947 पासून 4 वर्षे 1 महिना 26 दिवस काम करुन हिंदू कोड बिल तयार केले. हा मसूदा संसदेत 5 फेब्रुवारी 1951 रोजी संसदेत मांडला गेला. त्यात जी व्यक्ती मृत्युपत्र न करता मृत पावली असेल अशा मृत हिंदू व्यक्तीच्या (स्त्री आणि पुरुष दोघांच्याही) मालमत्तेच्या हक्कांबाबत, मृताचा वारसदार ठरवण्याचा अधिकार, पोटगी, विवाह, घटस्फोट, दत्तकविधान, अज्ञानत्व व पालकत्व या वेगवेगळ्या घटकांशी निगडित कायद्याचे कलमात रूपांतर करू पाहणारे होते.


भारतीय संविधान सभेने जात, धर्म, लिंग, प्रांत, भेद करून मानवप्राण्यात कायदा भेदाभेद करणार नाही, न्यायाच्या तराजूत सर्वांना एकाच मापात तोलले जाईल, अशी घोषणा करून स्वातंत्र्य व समता या तत्त्वांचा अंगिकार केलेला होता तरीही हिंदू स्त्रियांना त्याचे न्याय्य हक्क देण्यास विरोध झाला. हा कायदा पास न झाल्याने बाबासाहेबांनी स्वतंत्र भारताच्या पहिल्या कायदा मंत्री पदाचा राजीनामा दिला.


1955 मध्ये, भाषिक राज्यांवरील त्यांचा ग्रंथ प्रकाशित करून, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राची छोट्या व व्यवस्थापकीय राज्यात पुनर्रचना करण्याचा प्रस्ताव ठेवला, जे 45 वर्षानंतर काही राज्यात खरे ठरले.


निवडणूक आयोग, नियोजन आयोग, वित्त आयोग, स्त्री पुरुष एकसमान नागरी हिंदू कोड बिल, राज्य पुनर्गठन, मोठ्या आकाराचे राज्ये लहान आकारात संघटित करणे, राज्य धोरणाचे निर्देशक तत्त्व, मूलभूत हक्क, मानवाधिकार, नियंत्रक व महालेखा परीक्षक, निवडणूक आयुक्त आणि राजकीय संगठन मजबूत करणारे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि परराष्ट्र धोरण तयार केले. 


लोकशाही बळकट करण्यासाठी, देशातील तिन्ही अंगांना न्यायपालिका, कार्यकारी मंडळ आणि विधिमंडळ स्वतंत्र केले. आणि समान नागरी हक्कांनुसार एका व्यक्तीचे, एक मत आणि एक मूल्यचे तत्व प्रस्थापित केले.


◆ शिक्षण, सामाजिक सुधारणा आणि कामगार कल्याण


व्हायसराय कौन्सिलमध्ये कामगार मंत्री म्हणून कामगारांच्या हितासाठी कामाचे तास 12 वरून 8 तास, समान काम समान वेतन, प्रसूती रजा, भरपगारी रजा, कर्मचारी राज्य विमा योजना, आरोग्य संरक्षण, 1952 कर्मचारी भविष्य निर्वाह कायदा तयार केले. 1937 मध्ये मुंबई अध्यक्षीय निवडणुकीत त्यांनी कामगार आणि दुर्बल घटकांच्या हितासाठी स्वतंत्र मजदूर पक्षाची स्थापना करून सत्तेत थेट भाग घेत 17 पैकी 15 जागा जिंकल्या.


कर्मचारी राज्य विमा अंतर्गत आरोग्य, विश्रांती, अपंग सहाय्य, काम करताना अपघाती नुकसानीची भरपाई आणि इतर अनेक सुरक्षा सुविधांचा कामगार कल्याणमध्ये समावेश होता.


कर्मचार्‍यांच्या दैनंदिन भत्ते, अनियमित कर्मचार्‍यांना विश्रांतीची सुविधा, कर्मचार्‍यांच्या पगाराच्या श्रेणीचा आढावा, भविष्य निर्वाह निधी, कोळसा खाणी आणि मीका खाणकाम करणार्‍या कामगारांनाचे 1944 मध्ये सुरक्षा दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता.


1946 मध्ये त्यांनी निवास, पाणीपुरवठा, शिक्षण, करमणूक, सहकारी व्यवस्थापन इत्यादी पासून कामगार कल्याण धोरणाचा पाया रचला आणि भारतीय कामगार परिषद सुरू केली जे अजूनही चालू आहे, ज्यात कामगारांच्या ज्वलंत प्रश्नांवर दरवर्षी चर्चा केली जाते. पंतप्रधानांच्या उपस्थिती त्याचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न केले जातात.


कामगार कल्याण निधीच्या अंमलबजावणीसाठी सल्लागार समिती गठित करून जानेवारी 1944 मध्ये याची स्थापना केली गेली. कामगारांची स्थिती, दैनंदिन वेतन, उत्पन्नाचे इतर स्त्रोत, महागाई, पत, गृहनिर्माण, रोजगार, ठेव भांडवल, इतर निधी आणि कामगार विवादांशी संबंधित नियम तयार करण्यासाठी भारतीय सांख्यिकी कायदा संमत केला गेला.


8 नोव्हेंबर 1943 रोजी 1926 पासून प्रलंबित असलेल्या भारतीय कामगार कायदा कार्यान्वित करून त्यांनी त्या अंतर्गत भारतीय कामगार संघटना दुरुस्ती विधेयक प्रस्तावित केले आणि कामगार संघटनेची काटेकोरपणे अंमलबजावणी केली. कामगारांच्या हितासाठी आरोग्य विमा योजना, भविष्य निर्वाह निधी कायदा, कारखाना दुरुस्ती कायदा, कामगार विवाद कायदा, किमान वेतन कायदा आणि कायदेशीर हाताळणी अधिनियमित केले गेले.


◆ दुसरा विवाह


1935 मध्ये दीर्घ आजारानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पहिली पत्नी रमाबाई यांचे निधन झाले. 1940 च्या दशकात बाबासाहेबांच्या पायांमध्ये न्युरोपॅथीक वेदना होत होत्या आणि ते इंसुलिन आणि होमिओपॅथीची औषधे घेत होते. यावर उपचार घेण्यासाठी ते मुंबईला गेले आणि तेथे त्यांची डॉ. शारदा कबीर यांच्याशी भेट झाली. कबीर ह्या पुण्याच्या ब्राह्मण कुटुंबातील सदस्य होत्या. पुढे त्यांनी कबीरांशी 15 एप्रिल 1948 रोजी नवी दिल्ली येथील आपल्या घरी नोंदणी पद्धतीने विवाह केला. डॉ. कबीर यांच्याकडे डॉ. आंबेडकरांची काळजी घेण्यासाठी वैद्यकीय ज्ञान होते. विवाहानंतर शारदा कबीरांना बाबासाहेबांनी सविता हे नाव दिले.


◆ महापरिनिर्वाण


नागपूर व चंद्रपूर येथील धर्मांतराचे कार्यक्रम झाल्यावर आंबेडकर दिल्लीला परतले. त्यानंतर काही आठवड्यात 20 नोव्हेंबर 1956 मध्ये ते नेपाळमध्ये ‘‘वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट‘’च्या चौथ्या परिषदेस हजर राहिले. तेथे त्यांनी ‘‘बुद्ध की कालमार्क्स‘’ या विषयावर भाषण केले. त्यात त्यांनी भगवान बुद्धाचा मार्ग मार्क्स पेक्षा श्रेष्ठ आहे, ज्यात प्रेम, न्याय, बंधुत्व, विज्ञानवाद असून तो शोषण समाप्त करू शकतो असे सांगितले. आपल्या परतीच्या प्रवासात त्यांनी बनारस मध्ये दोन भाषणे दिली. दिल्लीमध्येही त्यांनी विविध बौद्ध समारंभांत भाग घेतला. त्यानंतर त्यानी राज्यसभेच्या अधिवेशनात भाग घेतला आणि आपल्या ‘‘भगवान बुद्ध आणि कार्ल मार्क्स’‘ या पुस्तकाचे शेवटचे प्रकरण लिहून पूर्ण केले. 5 डिसेंबरच्या सायंकाळी ‘‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’‘ या ग्रंथाच्या प्रास्ताविक आणि परिचय या दोन प्रकरणांच्या प्रती आणून त्यांनी रात्री त्यांची तपासणी केली. दुसऱ्या दिवशी पहाटे 12.15 वाजता 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्लीला निवासस्थानी त्यांचे महापरिनिर्वाण झाले. त्यावेळी त्यांचे वय 64  वर्ष आणि 7 महिन्याचे होते. दिल्लीहून विशेष विमानाने त्यांचे पार्थिव मुंबईला आणण्यात आले. मुंबई हे ठिकाण अत्यंविधीसीठी निश्चित झाले त्यानंतर देशभरातील त्यांचे अनुयायी मिळेल त्या साधनाने मुंबईला येऊ लागले.


आधुनिक भारताचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास आवडल्यास नक्की शेयर करा..

✒️ आपल्या भाषेत मराठी भाषेत 🇮🇳