adsense

गरुड आणि घुबड - मराठी गोष्टी : Stories in Marathi

गरुड आणि घुबड - मराठी गोष्टी


stroty
Stories in Marathi

             एक गरुड आणि एक घुबड, फार दिवस एकमेकांशी भांडत असत. शेवटी त्यांनी परस्परांशी मित्रत्वाने वागण्याची शपथ घेतली व एकमेकांच्या पिल्लांस खाऊ नये असे ठरविले. घुबड गरुडास म्हणाले, ‘गडया ! पण माझी पिल्ले कशी असतात, हे तुला ठाऊक आहे ना? ठाऊक नसेल, तर ती दुसऱ्या एखादया पक्ष्याची आहेत असे समजून तू त्यांना गट्ट करशील, अशी मला भीति वाटते,’ गरुड म्हणाला, ‘खरेच, तुझी पिल्ले कशी असतात, हे मला मुळीच ठाऊक नाही.’ घुबड म्हणाले, ‘ऐक तर. माझी पिल्ले फार सुंदर असतात. त्यांचे डोळे सुंदर, पिसे सुंदर, सगळेच काही सुंदर असते. या वर्णनावरून माझी पिल्ले कोणती हे तुला सहज समजेल.’

              पुढे एके दिवशी, एका झाडाच्या ढोलीत, गरुडास घुबडाची पिल्ले सापडली. त्यांजकडे पाहून तो म्हणाला, ‘किती घाणेरडी, कंडाळवाणी आणि कुरूप पिल्ले ही ! आपली पिल्ले फार सुंदर असतात, म्हणून घुबडाने सांगितले आहे. तेव्हा, ही घुबडाची पिल्ले खास नव्हते. यास मारून खाण्यास काही हरकत नाही.’ असे म्हणून त्याने त्या पिलांचा फडशा उडविला !

              आपली पिल्ले नाहीशी झालेली पाहून घुबड गरुडाला म्हणाले, ‘गडया ! माझी पिल्ले तूच मारून खाल्लीस, असे मला वाटते.’ गरुड म्हणाला, ‘मी खाल्ली खरी, पण तो माझा दोष नव्हे. तू आपल्या पिल्लाचे जे खोटेचे वर्णन केलेस, त्यामुळे ती मला ओळखिता आली नाहीत. इतकी कुरूप पिल्ले घुबडाची नसतील, दुसऱ्या एखादया पक्ष्याची असतील, असे समजून मी ती मारून खाल्ली, यात माझा काय अपराध आहे बरे?’

तात्पर्य - स्वतःसंबंधाची खरी हकीकत लपवून ठेवून, भलतीच हकीकत सांगणारा मनुष्य शेवटी आपणास संकटात पाडून घेतो.

Stories in Marathi