छत्रपती शिवाजी महाराज
Shivaji Maharaj Information in Marathi |
छत्रपती शिवाजीराजे भोसले हे भारतीय उपखंडाचा बराचसा भाग व्यापणाऱ्या मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. जनता त्यांना शिवराय, शिवाजी महाराज किंवा राजे नावाने संबोधतात. हिंदवी साम्राज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता म्हणून ओळखले जाणारे "छत्रपती शिवाजीराजे भोसले" एक सर्वसमावेशक, सहिष्णू राजा म्हणून महाराष्ट्रात आणि इतरत्रही वंदिले जातात. शत्रूविरुद्ध लढ्याकरता महाराष्ट्रातल्या डोंगर-दर्यांमधे अनुकूल असलेली गनिमी काव्याची पद्धत वापरून त्यांनी तत्कालीन विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणि बलाढ्य मुघल साम्राज्यशाही ह्यांच्याशी लढा दिला, आणि मराठी साम्राज्याचे बीजारोपण केले.
महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचा व कारकीर्दीचा आढावा घेतल्यास शौर्य, पराक्रम, शारीरिक सक्षमता, ध्येयवाद, कुशल संघटन, कडक व नियोजनबद्ध प्रशासन, मुत्सद्दीपणा, धाडस, द्रष्टेपण असे उच्च कोटीचे गुण महाराजांच्या व्यक्तिमत्त्वात एकवटलेले दिसतात.
◆ शिवरायांचे जन्म
शिवनेरीच्या नगारखाण्यात सनई, चौघडा वाजत होता अशा मंगल क्षणी शिवनेरी गडावर जिजाबाईंच्या पोटी पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर इ.स. १६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला.
इतिहासाच्या अभ्यासकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची नेमकी जन्मतारीख हा एकेकाळी मतभेदांचा मुद्दा होता. तो वाद नंतर मिटला. महाराष्ट्र राज्य शासनाने फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार. १९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख २००१ साली स्वीकारली.
त्यांचे वडील शहाजीराजे हे प्रथम अहमदनगरच्या निजामशहाच्या पदरी सरदार म्हणून कार्यरत होते. मुघल सम्राट शहाजहानच्या सैन्याने इ.स. १६३६ मधे अहमदनगरवर चाल करून ते शहर आपल्या ताब्यात घेतल्यानंतर शहाजीराजे विजापूरच्या आदिलशहाच्या पदरी सरदार म्हणून रूजू झाले. आदिलशहाने त्यांना पुण्याची जहागिरी दिली.
◆ शिवरायांचे बालपण
शिवरायांच्या वयाची पहिली सहा वर्षे फार धावपळीत गेली, पण या धावपळीतही जिजाबाईंनी शिवरायांना उत्तम शिक्षण दिले. सायंकाळी त्या सांजवात लावत. शिवबांना जवळ घेत, मायेने कुरुवाळत, जिजाबाई साधुसंतांच्या गोष्टी सांगत. त्यातून शिवरायांना साधुसंतांविषयी आदरबुद्धी निर्माण झाली. तसेच कधी नामदेवांचे, कधी ज्ञानेश्वरांचे तर कधी एकनाथांचे अभंग म्हणून दाखवत. शिवरायांना शूर पुरुषांच्या गोष्टी आवडत. मोठे झाल्यावर त्यांच्यासारखे पराक्रम करावे असे त्यांना वाटे.
गरीब मावळ्यांची मुले शिवरायांबरोबर खेळायला येत. कधीकधी शिवबाहि त्यांच्या झोपडीत जात. त्यांच्याशी गमतीदार खेळ खेळत. मावळ्यांची मुले पोपट, कोकीळ, वाघ यांचे हुबेहूब आवाज काढत. मातीचे हत्ती व घोडे बनविणे, मातीचे किल्ले रचणे हे त्यांचे छंद असायचे. लपंडाव, चेंडू, भोवरा हे यांचे नेहमीचे खेळ. शिवरायही त्या मुलाबरोबर हे खेळ खेळत.
◆ शिवरायांचे शिक्षण
पहिली गुरू आई आणि दुसरे गुरू दादोजी कोंडदेव यांच्या सानिध्यात आणि संस्कारांमधे महाराजांचे बालपण अतिशय उत्तम रितीने गेले. दादोजींनी त्यांना युध्दकौशल्यात आणि नितीशास्त्रात पारंगत केले.
स्वतः शहाजीराजे हे संस्कृतचे गाढे पंडित होते. त्यांनी आपल्या बंगळूरच्या दरबारात अनेक भाषांच्या पंडितांना आणि कलावंतांना आश्रय दिला होता. शिवरायांसाठी त्यांनी हुशार शिक्षकांची नेमनूक केली होती. शिवराय सात वर्षांचे झाल्यानंतर त्यांच्या शिक्षणाला प्रारंभ झाला. थोड्याच काळात शिवराय लिहिण्या वाचण्याच्या कलेत पारंगत झाले. रामायण, महाभारत, भागवत यातील गोष्टीं ते स्वतः वाचू लागले.
शहाजीराजांनी शिवरायांना युद्धकला शिकवण्यासाठी काही शिक्षकांची नेमणूक केली होती. त्यांनी शिवरायांस घोड्यावर बसने, कुस्ती खेळणे, दांडपट्टा फिरवणे, तलवार चालवणे इत्यादी विद्या शिकवण्यास प्रारंभ केला. अशा प्रकारे वयाच्या बाराव्या वर्षांपर्यंत शिवरायांना विविध विद्या व कला यांचा परिचय झाला.
◆ स्वराज्याची शपथ
पुण्याच्या नैऋत्येला असलेले रायरेश्वराचे देवालय हे मोठे रमणीय स्थान होते. रायरेश्वर म्हटले की, 'स्वराज्याची स्थापना' हा इतिहासातील रोमांचकारी प्रसंग डोळ्यांसमोर उभा राहतो. साधारण सतराव्या शतकाच्या मध्यावर शिवशाहीतील ती अद्भुत घटना या निबीड अरण्यात या रायरेश्वराच्या साक्षीने घडली.
१६४५ साली शिवबा आणि त्यांचे मावळे इथे एकेक करत जमले. या मावळ्यांमध्ये दादाजी नरसप्रभू गुप्ते, कान्होजी जेधे, बाजी पासलकर, तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, सोनोपंत डबीर असे स्वराज्यनिर्मितीतील बिनीचे शिलेदार होते. सारे एकेक करत जमले आणि या रायरेश्वराच्या साक्षीनेच त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या शपथा घेतल्या. 'हर हर महादेव'च्या घोषणांमध्ये एका नव्या अध्यायाची सुरुवात या रायरेश्वराने पाहिली.
मावळ प्रांत:
छत्रपती शिवाजीमहाराजांच्या सैन्यातील मावळ्यांनी शिवाजीराजांच्या सोबत हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात मोठा सहभाग नोंदवला. सह्याद्रीच्या दोन डोंगररांगांच्या मधल्या खोर्याला "मावळ" आणि खोर्यातील सैनिकांना "मावळे" म्हणत.
◆ तोरण गडावर विजय
तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधायचे, असे शिवरायांनी ठरवले. निवडक मावळ्यांच्या तुकड्या घेऊन शिवराय कानद खोऱ्यात उतरले. साऱ्या मावळ्यांसह ते सिंहाच्या छातीने व हरणाच्या वेगाने झपझप तोरणा चढून गेले. मावळ्यांनी भराभर मोक्याच्या जागा ताब्यात घेतल्या. तानाजी मालुसरे या वीराने दरवाजावर मराठ्याचे निशाण उभारले. येसाजी कंक हा शिवरायांचा विश्वासू आणि निष्ठावाण सहकारी, त्याने चौकीवर पहारे बसवले. किल्ला ताब्यात आला. सर्वांनी शिवरायांचा जयजयकार केला. शिवरायांनी या किल्ल्याला 'प्रचंडगड' असे नाव दिले. इ.स. १६४७ मध्ये सतरा वर्षांच्या शिवाजीराजांनी आदिलशहाच्या ताब्यातला तोरणगड जिंकला.
त्याच साली शिवाजीराजांनी कोंढाणा (सिंहगड), आणि पुरंदर हे किल्ले आदिलशहाकडून जिंकून पुणे प्रांतावर पूर्ण नियंत्रण मिळवले. या शिवाय तोरणगडासमोरील मुरुंबदेवाचा डोंगर जिंकून त्याची डागडुजी केली व त्याचे नाव त्यांनी 'राजगड' असे ठेवले.
◆ स्वराज्याची राजमुद्रा
छत्रपती शिवाजी यांनी जेव्हा पुण्यावर नियंत्रण मिळवून कारभार पाहू लागले, तेव्हा त्यांनी स्वराज्याची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली. ही राजमुद्रा संस्कृत भाषेत होती. ती खालीलप्रमाणे-
संस्कृत :
"प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता
शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते"
मराठी :
ज्याप्रमाणे प्रतिपदेचा चंद्र वाढत जातो, आणि साऱ्या विश्वात वंदनीय होतो,
तशीच शहाजींचा पुत्र शिवाजी महाराजांच्या मुद्रेचा लौकिक वाढत जाईल.
शहाजीराजांना अटक
शिवाजीराजांच्या यशस्वी स्वार्यां बिथरून शिवाजीराजांना आळा घालण्याची एक युक्ती म्हणून आदिलशहाने शहाजीराजांना अटक केली. शिवाय सुमारे ५००० फौज घेऊन फत्तेखान नावाच्या सरदाराला शिवाजीराजांवर हल्ला करण्यास पाठवले. शिवाजीराजांनी पुरंदरावर फत्तेखानाचा पराभव केला.
जावळी प्रकरण
आदिलशहाशी इमान राखणारा जावळीचा सरदार चंद्रराव मोरे शहाजीराजे आणि शिवाजीराजे यांच्याविरूद्ध आदिलशहाकडे कुरापती काढत असे. त्याला धडा शिकविण्यासाठी इ.स. १६५६ साली शिवरायांनी रायरीचा किल्ला सर केला. त्यामुळे कोकण भागात स्वराज्याचा विस्तार झाला. शिवरायांनी रायरी जिंकला होता त्याचाच पुढे 'रायगड' झाला, मराठा साम्राज्याची राजधानी. जावळीतून रायरी व प्रतापगडाबरोबर त्यांना वासोटा किल्लाही मिळाला जो आजही अतिशय दाट व भयंकर अरण्यात लपलेला आहे.
अफजलखान वध
आदिलशहाच्या ताब्यात असणारे किल्ले जिंकत राहिल्यामुळे इ.स. १६५९ साली आदिलशहाने दरबारात शिवाजी महाराजांना संपविण्याचा विडा ठेवला, हा विडा दरबारी असलेल्या अफझलखानने उचलला. परंतु शिवरायांनी अफजलखानाचा युद्धात वध केला.
प्रतापगडाची लढाई
प्रतापगडच्या युद्धात शिवाजी महाराजांच्या सैन्याने १० नोव्हेंबर १६५९ रोजी विजापूर सल्तनतचा पराभव केला. तेथे त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि युद्ध सामग्री मिळाली आणि त्यांच्या एकजुटीमुळे मराठा सैन्य खूप शक्तिशाली बनले, हे यश पाहून शिवाजी महाराज सर्व मराठ्यांचे वीर नायक बनले.
कोल्हापूरची लढाई
शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा १० नोव्हेंबर, १६५९ रोजी वध करून त्याच्या सेनेचा प्रचंड धुव्वा उडवला होता. डिसेंबर १६५९ मध्ये शिवाजी महाराज कोल्हापूर नजीक पन्हाळ्यानजीक पोहोचले व याच सुमारास अदिलशाही सरदार रुस्तमजमान मिरजेपाशी पोहोचला.
विजापूरच्या सुलतानाने पुन्हा रुस्तम जामनच्या नेतृत्वात शिवाजीराजांशी लढायला एक विशाल सैन्य पाठवले, पण त्यांचाही शिवाजी महाराजांनी पराभव केला. कोल्हापुरात २८ डिसेंबर १६५९ रोजी ही लढाई झाली. ज्यामध्ये मराठा सैन्याला बरेच घोडे, हत्ती आणि युध्द सामग्री मिळाली आणि त्यांची शक्ती दुप्पट झाली.
छत्रपती शिवाजी महाराज इतिहास |
छत्रपती शिवाजी महाराज आणि मुघल सल्तनत
या विजयानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५७ पासून मुघल प्रांतावर आक्रमण करण्यास सुरवात केली. एके दिवशी शिवाजी महाराजांनी अचानक रात्री पुण्यावर हल्ला केला ज्यामध्ये बरेच मुघल सैनिक ठार झाले आणि शिवाजी महाराजांना पुण्यावर ताबा मिळवण्यात यश आले.
त्यानंतर १६६१ मध्ये कर्तालाब खान यांना छत्रपती शिवाजी महाराजांविरुद्ध युद्धासाठी पाठवले गेले. पावनखिंडच्या युद्धात मराठ्यांच्या छोट्या सैन्याने आपल्या पराक्रमाच्या बळावर मुघलांच्या मोठ्या सैन्यांचा पराभव केला.
यानंतर १६६४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरतवर हल्ला केला आणि तेथून त्यांना बरीच संपत्ती मिळाली.
◆ पुरंदरचा तह
मग औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना सापळ्यात पकडण्यासाठी अंबरचा राजा जयसिंग व दिलीर खान यांना पाठवले. त्यानंतर जयसिंगांनी शिवाजी महाराजांचे बरेच किल्ले ताब्यात घेतले. १६६५ मध्ये शिवाजी महाराजांना पुरंदरचा तह बंद करण्यास भाग पाडले गेले.
कराराच्या अटींनुसार शिवाजी महाराजांच्या ताब्यात ठेवलेले २३ किल्ले मुघलांच्या स्वाधीन करावे लागले आणि शिवाजी महाराजांनी असेही म्हटले की विजापूरविरुद्धच्या लढाईत ते मुघलांना मदत करतील. त्याच बरोबर स्वतः आग्रा (तत्कालीन मुघल राजधानी) येथे पुत्र संभाजी यासह औरंगजेबासमोर हजर होण्याचे कबूल करावे लागले.
परंतु औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराज व मुलगा संभाजी यांना अत्यंत वाईट वागणूक दिली. या अपमानामुळे अतिशय नाराज होऊन शिवाजी महाराज तडक दरबाराबाहेर पडले असता त्यांना तत्क्षणी अटक करून नजर कैदेत ठेवण्यात आले. काही दिवसांतच शिवाजी महाराजांनी युक्ती चालवत संभाजीसह तेथून निसटून आले.
शिवाजीराजे परतल्यानंतर त्यांनी झालेल्या अपमानाचा सूड घेण्यासाठी पुरंदरच्या तहात दिलेले सर्व तेवीस किल्ले जिंकून घेतले. त्यांनी त्यातील पहिल्यांदा कोंढाणा घ्यायचे ठरवले. कोंढाण्याच्या लढाईत सुभेदार तानाजी मालुसरे यांस लढताना वीरमरण आले.
◆ शिवाजी महाराज राज्याभिषेक
१६७४ साली छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वत: ला संपूर्ण महाराष्ट्राचा शासक म्हणून घोषित केले आणि शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. त्यांनी छत्रपती पदवी धारण केली. या दिवसापासून शिवाजीराजांनी 'शिवराज्याभिषेक शक' सुरू केला आणि 'शिवराई' हे चलन जारी केले.
◆ छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू
राज्याभिषेक झाल्यानंतर अवघ्या ६ वर्षात हा महान राजा हे जग सोडून गेले ३ एप्रिल १६८०, चैत्र पौर्णिमा, शालिवाहन नृप शके १६०२ या दिवशी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहणारा आपला राजा निधन पावला.