adsense

भगवान बुद्ध यांचा इतिहास - History of Lord Buddha in Marathi

भगवान गौतम बुद्ध

       आपल्या विचारांसह जगाला एक नवीन मार्ग दाखविणारे भगवान गौतम बुद्ध (इ.स.पु. 563 - इ.स.पु. 483) एक महान तत्वज्ञ, वैज्ञानिक, धार्मिक गुरू, एक महान समाज सुधारक आणि बौद्ध धर्माचे संस्थापक होते. भारतीय संस्कृती ही बुद्ध प्रभावित संस्कृती आहे. ही संस्कृती नेपाळ, श्रीलंका, जपान, तिबेट, थायलंड, म्यानमार, चीन, कोरिया आदी देशात पसरली.

History of Lord Buddha in Marathi
Gautam Buddha Mahiti

◆ जन्म

     आजपासून सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी उत्तर भारतात राजा शुद्धोधन शाक्य या कोशल प्रांताचे राजा होते. त्यांची राजधानी कपिलवस्तू सध्याच्या नेपाळ मध्ये होती. त्याचे राज्य प्रजासत्ताक होते. शुद्धोधन हे नागवंशीय इक्ष्वाकू घराण्याचे वंशज होते. महाराज शुद्धोधनाच्या दोन राण्या होत्या. एकीचे नाव महामाया आणि दुसरीचे प्रजापती गौतमी होते. त्यांना कोणतीही संतान नव्हती. 

           एका रात्री राणी महामाया यांच्या स्वप्नात एक हत्ती कमळाचा फुल घेऊन येतो आणि त्याच दिवशी महाराणी गर्भवती होतात. शाक्यांच्या चालीरितींनुसार राणी महामाया प्रसूतीसाठी माहेरी निघाली आणि वाटेत लुंबिनीमधील बागेत एका शालवृक्षाखाली प्रसूत झाली. बाळाचे नाव सिद्धार्थ ठेवण्यात आले. सिद्धार्थाच्या जन्मानंतर काही दिवसांनी महामायेचे निधन झाले.

◆ सुरुवातीचे जीवन

      जन्मदात्या मातेच्या जागी त्याचे पालनपोषण त्याच्या मावशीने गौतमीने पोटच्या मुलाप्रमाणे केले. सिद्धार्थ लहान असताना असितमुनी नावाच्या एका विद्वानाने भविष्यवाणी केली की हा मुलगा चक्रवर्ती सम्राट तरी होईल किंवा संन्यासी होईल. त्यांच्या वडिलांनी त्यांना मानवी जीवनातील दुःखानपासून दूर ठेवले. त्याने सिद्धार्थाला चक्रवर्ती राजाच बनवण्याचा ध्यास घेतला होता. त्यासाठी त्यांनी प्रत्येक ऋतू करिता तीन महाल बांधले.

      राजपुत्रांचे वैभवशाली आयुष्य जन्मतःच प्राप्त झालेला सिद्धार्थ सुखात वाढत होता. दैन्य, दुःख, ताप, त्रास, वेदना यांचा त्यास वाराही लागू नये, धार्मिक वा आध्यात्मिक विचार, वैराग्य, यांपासून कोसभर दूरच देवण्यात आले. सिद्धार्थ लहानपणापासून प्रेमळ व करुणामय होते. तसेच तलवार चालवणे, घोडेस्वारी व धनुर्विद्या यात सर्व श्रेष्ठ होते.

◆ विवाह

    सोळा वर्ष वय झाल्यावर शुद्धोदनाने सिद्धार्थाचा विवाह यशोधरेशी लावून दिला. यथावकाश, तिने एका मुलास जन्म दिला. त्याचे नांव राहुल असे ठेवण्यात आले. धनवैभव, प्रेमळ पत्‍नी, राजस पुत्र- सौख्यास कांहीही कमी नाही असे 29 वर्षांचे आयुष्य, सिद्धार्थाला त्याच्या पित्याच्या इच्छेप्रमाणे चक्रवर्ती राजा होण्याच्या दिशेने सरळ रेषेत चालले होते.

◆ गृहत्याग

       एके दिवशी सिद्धार्थास नगरातून फेरफटका मारण्याची इच्छा झाली. त्याच्या सारथ्याच्या चन्नच्या अडविण्यास न जुमानता, हाती रथाचे सूत्र घेऊन, सारथ्यास मागे सारून हा चुकीच्या मार्गाने निघाला. पण आज ते त्याच्या पित्याने मोठ्या कष्टाने त्याच्यापासून दूर ठेवलेले वास्तव पहाणार होते. त्यांनी मार्गात काठीच्या साह्याने चालणारा एक वृद्ध दिसला. पुढे प्रथमच, जीर्ण शरीराचा रुग्ण पाहिला. एक प्रेतयात्रा त्यास दिसली. चन्नने त्यास सांगितले, की या साऱ्या जीवमात्राच्या अटळ अशा स्वाभाविक अवस्था आहेत. या गोष्टींचा त्याला अर्थ लागेना. तो सुन्न होऊन गेला. आपले सुख हा अपवाद आहे आणि जग दुःखात आकंठ बुडालेले आहे हा त्याला साक्षात्कार झाला. 

     त्यानंतर त्याने एक संन्यासी पाहिला आणि त्याची झोप उडाली, सुखात मन रमेनासे झाले. आपल्या वर्तमान सुखी आयुष्याची फलनिष्पत्ती जर शेवटी हीच अटळ असेल तर कठीण आहे. यांतून मुक्त होण्यासाठी संन्यास हाच अंतिम मार्ग उमजून त्याने संसाराचा त्याग करण्याचे ठरविले. 29 व्या वर्षी एका रात्री, प्रिय पत्‍नी यशोधरेचे ओझरते, अंतिम दर्शन घेऊन आणि बाळ राहुलचे मुख हळूच चुंबून सिद्धार्ध राजवाड्याबाहेर निघाला. त्याच्या सोबतीला सारथी चन्न कंठक नामक घोड्यासह उभा होता. गृहत्याग केल्यावर सिद्धार्थने तलवारीच्या साह्याने आपले केस कापले. आपले वस्त्र व अलंकार काढून चन्नला दिले आणि परत जाण्यास सांगितले.

◆ तपस्या

      सांसारिक जीवन परित्याग केल्यावर सिद्धार्थाने प्रथम राजगृह येथून आपल्या संन्यासी जीवनाची सुरुवात केली. संन्यासी अवस्थेत असलेल्या सिद्धारर्थाला मगध साम्राज्याचा राजा बिंबिसाराच्या सैनिकांनी ओळखले. राजा बिंबिसार त्याची थोरवी जाणून होता. त्यांनी त्याला आपले सिंहासन नजर केले. त्यास नाकारून सिद्धार्थाने ज्ञानप्राप्तीनंतर पहिली भेट मगध देशासाठी देण्याचे वचन दिले.
    
       ज्ञानाच्या शोधात सिद्धार्थाने एकापाठोपाठ दोन गुरूंचे शिष्यत्व पत्करले. अध्यात्ममार्गातील त्याची प्रगती पाहून, दोघांनीही त्याला आपला वारसा पुढे चालवण्यासाठी निवडले. परंतु आत्मोद्धारापेक्षा स्वजनांच्या उद्धारासाठी आकांक्षा मनात बाळगणाऱ्या सिद्धार्थाने त्या दोघांसही नकार दिला. पुढे सिद्धार्थ आणि इतर पाच सहसंन्यासी यांनी संपूर्ण ऐहिक सुखाचा पूर्णं त्यागाचा मार्ग स्वीकारला. अन्नपाण्याचाही त्याग करण्याचा हा मार्ग अतिशय बिकट होता. अन्नाचे प्रमाण दिवसाला झाडाचे अवघे एक पान एवढे राहिले. शरीर क्षीण होऊन गेले. एके दिवशी स्नान करीत पाण्यात बुडण्यापर्यंत प्रसंग आला, तेव्हा सुजाता नावाच्या एका स्त्रीने त्यांना बघितले. 

      सिद्धार्थाने या मार्गाचा फेरविचार करण्यास सुरुवात केली. या मार्गाने ज्ञानप्राप्ती होणे नाही या विचाराने त्यांनी ध्यानाचा मार्ग पत्करला. सिद्धार्थाने मध्यममार्ग निवडला. शरीर हे साधन आहे, ते नाकारून चालणार नाही. शरीर धारण करुनच आत्मबोध होऊ शकेल. शरीरला आवश्यक एवढेच अन्न ग्रहण करावे, पण शारीरिक भोगापासून दूर राहण्याचे ठरवले. सुजतानी दिलेली खीर खाली. सिद्धार्थ आपल्या सत्य शोधाच्या मार्गापासून ढळला आहे, हे पाहून पाच संन्यासी त्यांना सोडून निघून गेले.

History of Lord Buddha in Marathi
Buddha information in Marathi

◆ ज्ञानप्राप्ती

      गृहत्यागानंतर सिद्धार्थ गौतमाने ज्ञानप्राप्तीसाठी खूप चिंतन केले, कठोर तपस्या केली. आताच्या बिहार राज्यातील बोधगया येथे निरंजना नदीच्या काठी पिंपळाच्या वृक्षाखाली बसून त्याने अंतिम सत्याची ज्ञानप्राप्ती होईपर्यंत न उठण्याचा निश्चय केला. 49 दिवसांच्या अखंड अविरत तपस्येनंतर, वयाच्या 35 व्या वर्षी बोधिवृक्षाच्या छायेत इ.स.पु. 528 मध्ये वैशाखी पौर्णिमेच्या दिवशी अखेर त्यास दिव्य ज्ञानप्राप्ती झाली.

    या ‘दिव्य ज्ञाना’ला ‘संबोधी’, ‘बुद्धत्व’ किंवा ‘निर्वाण’ असेही म्हणतात. ज्ञानप्राप्तीनंतर सिद्धार्थ गौतमाला सर्वजण ‘बुद्ध’ म्हणू लागले. बुद्ध ही व्यक्ती नव्हे ती ज्ञानाची अवस्था आहे. ‘बुद्ध’ म्हणजे अतिशय ज्ञानी मनुष्य.

◆ धम्मचक्र प्रवर्तन

      भगवान बुद्धांनी उत्तर प्रदेश मधील सारनाथ येथे त्यांना सोडून गेलेल्या पाच पंडितांना पहिला उपदेश दिला.  त्यांच्या पहिल्या उपदेशास ‘धम्मचक्रप्रवर्तन’ किंवा ‘धम्मचक्कपवत्तन’ असे म्हणतात. या प्रवचनात बुद्धांनी बौद्ध धम्माची मूलतत्त्वे सांगितली.

    भगवान बुद्ध म्हणतात, ‘‘मानवी जीवन हे दुःखमय आहे, दुःखाची निर्मिती तृष्णेतून (वासना, इच्छा, आसक्ती, आवड) होते, म्हणून या तृष्णेवर म्हणजे आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवले पाहिजे. यासाठी मध्यम मार्गाचा अवलंब केला पाहिजे. मानवी व्यवहाराच्या मुळाशी चार आर्यसत्ये आहेत.

1. दुःख :- मानवी जीवन हे दुःखमय आहे. 
2. तृष्णा :- मनुष्याच्या न संपणाऱ्या इच्छा हे दुःखाचे कारण आहे.
3. दुःख निरोध :- दुःखाचे निराकरण वा अंत सर्व प्रकारची आसक्ती सोडण्याने होतो.
4. प्रतिपद् :- दुःख निवारण्यासाठी सदाचाराचा मार्ग (अष्टांग मार्ग) आहे.

      महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांनी सारनाथ येथे धम्मचक्र प्रवर्तनाचे विवेचन करतांना नीती व सदाचाराला महत्त्व देऊन मानवाचे जीवन सुखकर होण्यासाठी तसेच निवार्णाच्या समीप पोहोचण्यासाठी हा ‘अष्टांग मार्ग’ किंवा ‘मध्यम मार्ग’ सांगितला.

1. सम्यक दृष्टी :- निसर्ग नियमाविरुद्ध कोणतीही गोष्ट होऊ शकते ही गोष्ट न मानणे.

2. सम्यक संकल्प :- म्हणजे योग्य निर्धार, विचार.

3. सम्यक वाचा :- करुणायुक्त व सत्यपूर्ण वाचा (बोल) ठेवण्याचा प्रयत्न करणे.

4. सम्यक कर्मांत :- उत्तम कर्म म्हणजे योग्य कृत्ये करणे.

5. सम्यक आजिविका :- वाईट मार्गाने आपली उपजीविका न करता ती सन्मार्गानेच करणे.

6. सम्यक व्यायाम :- वाईट विचार निर्माण झाल्यास त्याचा त्वरित नाश करणे.

7. सम्यक स्मृती :- तात्त्विक गोष्टींचे स्मरण करून चित्तास (मनाला) जागृत ठेवणे.

8. सम्यक समाधी :- कोणत्याही वाईट विकारांना स्पर्श होऊ न देता दुष्ट प्रवृत्तीपासून मन अलग ठेवून चित्त प्रसन्न आणि शांत ठेवणे.

त्यात त्यांना अनेक अनुयायी लाभले आणि बौद्ध धर्म वाढीस लागला.

◆ समाज जीवनावर प्रभाव

   भगवान बुध्दांनी त्या काळात असलेल्या सर्व अनिष्ट प्रथा परंपरांचा विरोध केला. यज्ञात दिल्या जाणाऱ्या प्राण्यांचे बळी, चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा त्यांनी विरोध केला. पाखंडी मताचा त्यांनी धिक्कार केला. भगवान बुद्ध म्हणतात माझ्या धम्माचा आत्मा, कर्मकांड व मरणोत्तर जीवनाशी कसलाही संबंध नाही. माणूस आणि माणसाचे माणसाशी या जगातील नाते हा माझ्या धम्माचा केंद्रबिंदू आहे. 

      तथागत गौतम बुद्धांनी संप्रदाय, वर्ण व समाजीक दर्जा ह्या कोणत्याही बाबींचा विचार न करता सर्व व्यक्तींमध्ये समता प्रस्थापित करण्याविषयी धर्मोपदेश केला. त्यांनी स्त्रियांना देखील संघात प्रवेश दिला. बौध्द धर्मातील अहिंसा, सर्व प्राणिमात्रांविषयी प्रेम व सहानभूती इत्यादी विचारांनी इतर धर्मांवर प्रभाव टाकला. विज्ञानवादी बौद्ध धर्माने लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन बिंबविण्यासाठी साहाय्य केले आहे.

     बौद्ध धर्माने शिक्षण प्रसारास प्रोत्साहन दिले. बौध्द विहार व बौद्ध मठ यांनी शिक्षण प्रसाराची केंद्रे म्हणून कार्य केले. बौद्ध भिक्खू हे मोठे विद्वान होते. बौद्ध धर्मास ज्या भारतीय सम्राटांनी व राजांनी पाठिंबा दिला त्यांनीही शिक्षणास प्रोत्साहन दिले. बुद्ध, बौद्ध भिक्खू आणि बौद्ध धर्मप्रचारकांनी धार्मिक विचार हे लोकांच्या नेहमीच्या भाषेत (पाली) मांडल्यामुळे बौद्ध धर्माचा प्रसार जलद गतीने झाला.

History of Lord Buddha in Marathi

◆ महापरिनिर्वाण

        वयाच्या 80 व्या वर्षापर्यंत भगवान बुद्धांनी सर्व जगाला सधम्माचा मार्ग सांगितला. अखेर बुद्धांनी कुंदा नावाच्या लोहारकडून शेवचे जेवण घेतले होते. त्यामुळे ते गंभीर आजारी पडले. बुद्धांनी आपला शिष्य आनंदला कुंदाला समजावून सांगायला सांगितले की त्याने कोणतीही चूक केली नाही. कुशीनगर मध्ये इ.स.पू. 483 मध्ये वयाच्या 80 व्या वर्षी तथागत बुद्धांचे महापरिनिर्वाण झाले.


✒️ आपल्या भाषेत मराठी भाषेत 🇮🇳