adsense

हंस हा कोणाचा ? - मराठी गोष्टी : Stories in Marathi

हंस कोणाचा ? - मराठी गोष्टी


Buddha Story in Marathi

                भगवान गौतमबुध्दांच्या बालपणीची गोष्ट. दहा अकरा वर्षाचं वय होतं त्या वेळी त्यांचं आणि ते तेव्हा त्यांच्या मूळ 'सिध्दार्थ' या नावानंच ओळखले जात होते.एकदा छोटा सिध्दार्थ आपल्या मित्रासह राजोद्यानात बोलत बसला असता-बाण लागल्यामुळे रक्तबंबाळ झालेला एक हंस कसाबसा उडत त्याच्या पुढ्यात येऊन पडला. सिध्दार्थने त्याला उचलले, जवळच्या पुष्करणीपाशी नेऊन पाणी पाजलं, आणि थोडा वेळ प्रेमानं कुरवाळलं. नतंर त्यानं त्याची जखम धुवून तिच्यावर कसली तरी औषधी वनस्पती लावली. एवढं झाल्यावर त्या हंसाला थोडं बरं वाटू लागलं.

             तेवढ्यात सिध्दार्थचा अंदाजे त्याच्याच वयाचा चुलतभाऊ देवदत्त तेथे आला व म्हणाला, 'सिध्दार्था, या हंसाला बाण मारुन मी घायाळ केले असल्याने, हा माझा आहे, तेव्हा त्याला माझ्या स्वाधीन कर.'सिध्दार्थ म्हणाला, 'देवदत्ता, एखाद्याच्या जिवावर उठलेल्या माणसापेक्षा, त्याच्या जिवाचं रक्षण करणाऱ्याचाच त्याच्यावर खरा अधिकार असतो. तू या हंसाच्या जिवावर उठला होतास, पण मी याला वाचवला, तेव्हा हा हंस आता माझाच आहे..'
अखेर देवदत्त हा सिध्दार्थच्या वडिलांकडे गेला व त्याने त्यांच्याकडे सिध्दार्था विरुध्द तक्रार केली. महाराजांनी सिध्दार्थाला बोलावून घेतलं व त्याचं म्हणणंही ऎकून घेतलं. त्यानंतर ते सिध्दार्थला म्हणाले, बाळ ! एकून धर्मशास्त्राच्या दृष्टीनं विचार करता, या हंसाचं रक्षण तू केलसं म्हणून हा हंस तुझा आहे हे खरं असलं, तरी क्षात्रधर्माचा विचार करता, एखाद्या क्षत्रियानं एखाद्या प्राण्याची शिकार केली, की तो प्राणी पुर्ण मेलेला असो वा अर्धवट मेलेला असो, तो त्या क्षत्रियाच्याच मालकीचा होता. या हंसाला देवदत्तानं घायाळ केलं असल्याने हा त्याचाच ठरतो.'

              यावर तीक्ष्ण बुध्दीचा सिध्दार्थ वडिलांना म्हणाला, 'महाराज ! क्षात्रधर्माच्या दृष्टीनं विचार केला, तरी हा हंस माझ्याजवळच राहू देणे इष्ट ठरते. देवदत्तानं या हंसाला बाणानं अर्धवट मारला असता ज्या अर्थी हा माझ्या पायाशी येऊन पडला, त्या अर्थी या शरणागताला अभय देऊन याचं रक्षण करणं हे क्षत्रिय म्हणून माझं कर्तव्या नाही काय ?'बाल सिध्दार्थाच्या या असामान्य बुध्दीतेजानं थक्क झालेले त्याचे वडील म्हणाले, खरं सांगायचं, तर हा हंस नक्की कुणाचा, हे मलाच कळेनासं झालं आहे. तेव्हा आपण हे प्रकरण आपल्या राज्याच्या न्यायमुर्तीकडे नेऊ.'

             न्यायमुर्तीकडे हे प्रकरण जाताच त्यांनी त्या हंसाला एका सेवकाला दिले, आणि तिथून परस्परविरुध्द दिशांना समान अंतरावर देवदत्त व सिध्दार्थ यांना बसायला सांगून, त्या दोघांनाही त्या हंसाला आपल्याकडे बोलवायला सांगितले. प्रथम देवदत्तानं टाळी वाजवून 'ये,ये,' म्हणत हात हालवून त्या हंसाला आपल्याकडे बोलावलं, पण त्या हंसानं त्याच्याकडे ढुंकुनही बघितलं नाही. त्यानंतर सिध्दार्थानं त्या हंसाला एकदाच 'ये' म्हणताच, तो जखमी हंस मोठया कष्टानं उडत उडत त्याच्याकडे गेला व त्याला बिलगून बसला !तो प्रकार पाहून न्यायमुर्ती म्हणाले, हंस कुणाचा या प्रश्नाचं उत्तर आता प्रत्यक्ष या हंसानंच दिलं असल्यानं, मी वेगळा निर्णय देण्याचा प्रश्न उरत नाही.'

तात्पर्य :- मारणाऱ्या पेक्षा तारणारा श्रेष्ठ असतो.

Stories in Marathi