adsense

भगत सिंग यांचे जीवनचरित्र - Bhagat Singh Biography in Marathi

भगत सिंग

     शहीद भगतसिंग हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अग्रणी क्रांतिकारक होते. वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी देशासाठी आपले बलिदान देणारा हा नायक कायमस्वरूपी अमर झाला. भगतसिंग यांनी युरोपियन क्रांतिकारक चळवळीबद्दल वाचले होते त्यामुळे ते समाजवादाकडे अत्यंत आकर्षित झाले. त्यांच्या मते, ब्रिटिश सत्ता उलथून टाकण्यासाठी आणि भारतीय समाजाच्या पुनर्रचनेसाठी राजकीय सत्ता मिळवणे आवश्यक होते.

      ब्रिटीश सरकारने त्यांना दहशतवादी घोषित केले असले तरी सरदार भगतसिंग हे वैयक्तिकरित्या दहशतवादाचे समालोचक होते. भगतसिंग यांनी भारतातील क्रांतिकारक चळवळीला नवी दिशा दिली. त्याचे तत्कालीन ध्येय ब्रिटीश साम्राज्याचा नाश करण्याचे होते. त्यांच्यासाठी क्रांती - म्हणजे अन्यायमुळे निर्माण झालेली परिस्थिती बदलणे. दूरदर्शीपणा आणि दृढ हेतूमुळे भगतसिंग हे राष्ट्रीय चळवळीतील इतर नेत्यांपेक्षा वेगळे होते. 

Bhagat Singh Biography in Marathi
Bhagat Singh Mahiti

◆ सुरुवातीचे जीवन

     भगतसिंग यांचा जन्म 28 सप्टेंबर 1907 रोजी पंजाबमधील ल्यालपूर जिल्ह्यातील बंगा या गावात (तत्कालीन पाकिस्तानात) एका शिख कुटुंबात झाला. त्यांच्या स्मरणार्थ या जिल्ह्याचे नाव आता शहीद भगतसिंग नगर असे करण्यात आले आहे. ते सरदार किशन सिंह आणि विद्यावती यांचे तिसरे मूल होते. स्वातंत्र्यलढ्यात भगतसिंग यांचे कुटुंबीय सक्रियपणे सहभागी होते. त्याचे वडील किशन सिंह आणि काका अजितसिंग हे गदर पक्षाचे सदस्य होते. गदर पार्टीची स्थापना अमेरिकेत ब्रिटिश राजवट भारतातून काढून टाकण्यासाठी केली गेली होती. 

        तरुण भगतसिंगांच्या मनावर कुटुंबाच्या वातावरणाचा मोठा परिणाम झाला होता आणि लहानपणापासूनच त्यांच्या मनात देशप्रेमाची भावना निर्माण झाल्याने त्यांनी लाहोर येथील खालसा ब्रिटीश इंग्रजी शाळेत सुद्धा प्रवेश घेतला नाही. त्यांनी लाहोर मधील डी.ए.व्ही. शाळेत शिक्षण घेण्यास सुरुवात केली. लहानपणीच त्यांनी अभासव्यतिरिक अनेक पुस्तके वाचली होती. घरच्या वातावरणातच ते निडर, धाडसी व पराक्रमी बनले, स्वातंत्र्याविषयी त्याची मते दृढ होत गेली.


● जालियनवाला बाग हत्याकांड

     1916 मध्ये लाहोरमधील डीएव्ही शाळेत शिकत असताना भगतसिंग यांचा संपर्क लाला लाजपत राय आणि रास बिहारी बोस यांच्यासारख्या नामांकित राजकारण्यांच्या सोबत आला. त्यावेळी पंजाब राजकीयदृष्ट्या खूप आक्रमक होता. जालियनवाला बाग हत्याकांड घडला तेव्हा भगतसिंग अवघ्या 12 वर्षांचे होते. जालियान बागेत इंग्रज सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी जमलेल्या हजारो लोकांनवर ब्रिटिश सरकारचे जनरल मेजर डायर यांनी आपल्या सैनिकांना गोळीबार करण्याचा आदेश दिला आणि त्या हल्ल्यात तिथे जमलेल्या लोकांपैकी हजारो लोकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यात लहान मुलांचा देखील समावेश होता. 

      या हत्याकांडामुळे त्यांना खूप त्रास झाला त्याच्या मनात ब्रिटिश सरकार विरोधात अधिक द्वेष निर्माण होत गेला. हत्येच्या दुसर्‍याच दिवशी भगतसिंग जालियनवाला बाग येथे गेले आणि तेथून रक्तात भरलेली माती आपल्या घरी घेऊन आले. त्यांनी त्याचं क्षणी ब्रिटिश सरकारला देशाच्या बाहेर काढण्याची शपथ घेतली. तसेच आपले संपूर्ण जीवन हे देशाच्या स्वातंत्र्यासाठी अर्पण करण्याचे ठरवले. या हत्याकांडामुळे इंग्रजांना भारतातून पळवून लावण्याचा त्यांचा संकल्प आणखी दृढ झाला.

◆ स्वातंत्र्य लढा

        वयाच्या 14 वर्षी  गुरुद्वारात नानकाना साहेब येथे अनेक लोकांना ठार मारण्याविरुद्धच्या आंदोलनात ते सामील झाले. 1921 मध्ये जेव्हा महात्मा गांधींनी ब्रिटिश राजवटीविरूद्ध असहकार चळवळीची हाक दिली तेव्हा भगतसिंग यांनी आपले शिक्षण सोडून ते चळवळीत सक्रिय झाले. 1922 मध्ये गोरखपूरच्या चौरी-चौरा येथे असहकार चळवळ महात्मा गांधींनी बंद केल्यानंतर भगतसिंगांचा अहिंसेच्या मार्गाबद्दल भ्रमनिरास झाला. भगतसिंग फार निराश झाले. ते अशा निष्कर्षापर्यंत पोहचले की स्वातंत्र्य मिळविण्याचा एकमेव उपयुक्त मार्ग म्हणजे सशस्त्र क्रांतीच होय. आपला अभ्यास सुरू ठेवण्यासाठी भगतसिंग लाहोरमध्ये लाला लाजपत राय यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रीय शाळेत प्रवेश घेतला. ही शाळा क्रांतिकारी उपक्रमांचे केंद्र होती आणि येथेच ते भगवती चरण वर्मा, सुखदेव आणि इतर क्रांतिकारकांच्या संपर्कात आले. त्यांनतर ब्रिटिश सरकारचा हिंसक मार्गाने पाडाव करण्यासाठीच्या विचारांचे ते समर्थक बनले.

      वैवाहिक जीवन टाळण्यासाठी भगतसिंग घरातून पळून  कानपूरला आले. येथे त्यांची भेट गणेश शंकर विद्यार्थी नावाच्या क्रांतिकारकाशी झाली आणि त्यांच्याकडूनच क्रांतीचा पहिला धडा शिकले. आजीच्या आजाराची बातमी कळताच भगतसिंग घरी परतला. त्यांनी लाहोरला जाऊन 'नौजवान भारत सभा' ​​नावाची एक क्रांतिकारी संस्था स्थापन केली. त्यांनी आपल्या गावातून क्रांतिकारक कामे सुरू ठेवली. त्यांनी पंजाबमध्ये स्वातंत्र्यचा संदेश देण्यास सुरवात केली. 1928 मध्ये दिल्लीतील क्रांतिकारकांच्या बैठकीला चंद्रशेखर आझाद यांच्या संपर्कात आले. त्यांनी मिळून हिंदुस्तान सोशलिस्ट डेमोक्रॅटिक युनियनची स्थापना केली. सशस्त्र क्रांतीद्वारे भारतात प्रजासत्ताक प्रस्थापित करणे हे त्याचे मुख्य उद्दीष्ट होते.

       फेब्रुवारी 1928 मध्ये इंग्लंडच्या सायमन कमिशन नावाच्या आयोगाने भारत दौरा केला. त्यांच्या भारत भेटीचा मुख्य हेतू - भारतीय लोकांची स्वायत्तता आणि राजशाहीमध्ये सहभाग. परंतु या आयोगात कोणताही भारतीय सदस्य नव्हता, यामुळे त्यांनी सायमन आयोगाचा विरोध करण्याचा निर्णय घेतला. लाहोरमध्ये सायमन कमिशनविरोधात घोषणाबाजी करत असताना लाला लाजपत राय यांच्यावर निर्घृणपणे लाठीमार करण्यात आला ज्यामुळे ते गंभीर जखमी झाले आणि नंतर त्याचा मृत्यू झाला. भगतसिंग यांनी लाजपत राय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी ब्रिटिश अधिकारी स्कॉटला ठार मारण्याचा निर्णय घेतला. त्यांनी स्कॉट समजून सहाय्यक अधीक्षक सॉन्डर्सची हत्या केली. फाशीच्या शिक्षेपासून वाचण्यासाठी भगतसिंग यांना  लाहोर सोडावे लागले.

        ब्रिटीश सरकारने भारतीयांना हक्क, स्वातंत्र्य आणि असंतोषाचे मूळ कारण शोधण्याऐवजी अधिक अत्याचारी धोरणांचा उपयोग केला. डिफेन्स ऑफ इंडिया कायद्याच्या माध्यमातून ब्रिटीश सरकारने पोलिसांना अधिकाधिक दडपशाही दिली. त्याअंतर्गत पोलिस संशयास्पद कारवायांशी संबंधित मिरवणूका थांबवून लोकांना अटक करण्यास सुरू केले. केंद्रीय विधानसभेत आणलेल्या या कायद्याचा एका मताने पराभव झाला. तथापि, ब्रिटीश सरकारने त्याला 'जनहितार्थ' असे संबोधून हा अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतला. जथे अध्यादेश पारित करण्यासाठी बैठक घेण्यात येत होती तेथे भगतसिंग यांनी मध्यवर्ती विधानसभेत स्वेच्छेने बॉम्ब फेकण्याची योजना आखली. त्यांचा उद्देश कोणाला मारणे किंवा दुखापत करणे नसून सरकारचे लक्ष वेधून घेण्याची आणि त्यांच्या दडपशाही करण्याच्या पद्धती यापुढे खपवून घेता येणार नाहीत हे दाखवण्याचा हेतूपूर्वक काळजीपूर्वक आखलेला कट होता.

◆ भगत सिंग यांना फाशीची शिक्षा

      8 एप्रिल 1929 रोजी भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी केंद्रीय विधानसभेच्या अधिवेशनात बॉम्ब फेकले. बॉम्बस्फोटामुळे कोणाचेही नुकसान झाले नाही. त्यांनी घटनास्थळापासून पळ न  काढता  स्वतःला इंग्रजांच्या स्वाधीन केलं. सुनावणीदरम्यान भगतसिंग यांनी कोणताही बचाव सल्ला घेण्यास नकार दिला.भगतसिंग सुमारे 2 वर्षे तुरूंगात राहिले. या काळात ते लेख लिहून आपली क्रांतिकारक मते मांडत असत. तुरुंगात असतानाही त्याचा अभ्यास चालू होता. त्या काळात लिहिलेले त्यांचे लेख आणि नातलगांना लिहिलेली पत्रे अजूनही त्यांच्या विचारांचे प्रतिबिंब आहेत. 

        त्यांनी आपल्या लेखात भांडवलदार आपले शत्रू असल्याचे वर्णन केले आहे. तसेच कामगारांचा शोषण करणारा एखादा भारतीय जरी असला तरी तो त्यांचा शत्रू आहे असे सुद्धा त्यांचे मत होते. त्यांनी तुरूंगात इंग्रजीत एक लेखही लिहिला होता ज्याचे नाव "मी नास्तिक का आहे?"   तुरूंगात असताना त्यांनी तुरूंगातील अधिका-यांनी केलेल्या राजकीय कैद्यांवरील अमानुष वागणुकीचा निषेध म्हणून 64 दिवस उपोषण केले. त्यात यतींद्रनाथ दास या त्यांच्या साथीदाराने उपोषणामध्येच आपले प्राण सोडले. 

     7 ऑक्टोबर 1930 रोजी भगतसिंग, सुख देव आणि राज गुरू यांना विशेष कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली. भारताच्या सर्व राजकीय नेत्यांचा प्रचंड दबाव व असंख्य अपील असूनही भगत सिंग आणि त्यांच्या साथीदारांना 23 मार्च 1931 रोजी फाशी देण्यात आली.

 आपले सर्व जीवन देशासाठी समर्पित करणाऱ्या शाहिद भगत सिंग यांना त्रिवार वंदन 🙏

 ✒️  आपल्या भाषेत मराठी भाषेत  🇮🇳