adsense

एका आदिवासीचे मनोगत : Marathi Nibandha

एमी एक माणूस - एक आदिवासी


adivasi
Marathi Nibandha on Adivasi


'लोकहो, मी प्रथम तुमचे मनःपूर्वक आभार मानतो, कारण आज तुम्ही मला दूरचित्रवाणीवर बोलायची संधी दिली आहे. आमचे एक पथक नुकतेच राजधानीतील प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात भाग घेऊन परत आले. स्वातंत्र्योत्तर काळात लोक आता आमची दखल घेऊ लागले आहेत. आम्हीही माणसे आहोत अशी भोवतालच्या समाजाला आता जाणीव होऊ लागली आहे; आणि आमच्यातील माणूस जागा होत आहे याचीही जाणीव सर्वात झाली आहे.

आजवर वर्षानुवर्षे आम्हांला गुराढोरांप्रमाणे वागवले जात होते. आमच्यात बेठबिगारी होती. वर्षानुवर्षे पगाराशिवाय आमची माणसे जमीनदारांच्या शेतावर गुलाम म्हणून रावत होती. लग्नासाठी काढलेल्या कर्जामुळे आमच्यापैकी प्रत्येक आदिवासी व त्याची बायकोमुले सावकाराचे कायमचे गुलाम होऊन हलाखीचे जीवन जगत असत.

इतके कष्ट करूनही आम्हां आदिवासींना कधी पोटभर अन्न व अंगभर वस्त्र मिळत नव्हते. बिनदुधाचा चहा, अंबाडीची भाजी, कोड्याची भाकरी हेच आमचे जेवण ! काटक्या, झोपडी व लंगोटी याच आमच्या अत्यंत माफक गरजा ! पण त्याही कधी भागत नाहीत. गावात दुर्दैवाने रोगाची साथ आली की, आमचे हाल विचारू नका. कारण आमच्या या पाड्यांतून वस्तीतून वैदयकीय व्यवस्था काहीच नाही. गावांपासून दूर आत डोंगरात राहणाऱ्या आदिवासीची स्थिती अतिशयच दयनीय आहे. तेथे शेकडो मुले कुपोषणामुळे मरण पावल्याचे तुम्ही ऐकले असेलच!

अगदी अलीकडे आमच्या अडीअडचणीकडे समाजाचे थोडेसे लक्ष जाऊ लागले आहे. कै. गोदावरी परुळेकरांसारख्या जागृत कार्यकत्यांनी आमच्यातील माणूस जागा केला आहे. आमच्या वस्तीत आता शाळा निघाली आहे. मी या शाळेतून मॅट्रिक झालेला पहिला विद्यार्थी. मी महाविद्यालयीन शिक्षणही घेतले आहे. मला चांगली नोकरी मिळाली असती, पण तो मोह आवरून मी माझ्या माणसांतच काम करायचे ठरवले आहे. अज्ञान झटकून आता | ही आदिवासी माणसे हळूहळू प्रगती करत आहेत. माझ्या या जातबांधवांनी खूप शिकून इतरांसारखे मानाचे जीवन जगावे, यासाठीच माझी सारी धडपड आहे. "

...मराठी निबंध !