adsense

लांडगा विषयी माहिती : Wolf Information in Marathi

 लांडगा


Landga Mahiti Marathi


लांडगा : हा सस्तन प्राणी कॅनिडी कुलातील आणि ⇨कुत्र्याच्या प्रजातीतीलच आहे. याचे शास्त्रीय नाव कॅनिस ल्युपस आहे. भारतात आढळणाऱ्या लांडग्याचे शास्त्रीय नाव कॅ. ल्युपस पॅलिपीस असे आहे. कॅ. नायजर ही लहान व लाल जाती मूळची अमेरिकेच्या टेक्सस व फ्लॉरिडा राज्यांतील आहे. कॅनिडी कुलात लांडगे, ⇨कोल्हे,⇨खोकड आणि कुत्र्यांचा ( रानटी व पाळीव ) समावेश होतो. पाळीव कुत्र्यांचे काही प्रकार वगळले, तर लांडगा या कुलातील सर्वांत मोठा प्राणी आहे. याचा प्रसार यूरोप, उत्तर अमेरिका आणि उत्तर, मध्य व नैर्ऋत्य आशियात झालेला आहे. हा तिबेट, लडाख, काश्मीर यांच्या सीमावर्ती भागात आणि खुद्द भारतात आढळतो. ओसाड त्याचप्रमाणे कोरड्या उघड्या, मैदानी प्रदेशात याचे वास्तव्य असते. लांडगे अरण्यातसुद्धा राहतात.


लांडग्याची लांबी ९०-१०५ सेंमी., शेपूट ३५-४० सेंमी., खांद्यापाशी उंची ६५-७५ सेंमी. असते. हिमालयातील लांडगे मोठे असतात. त्यांच्या रंगांत बदल दिसून येतात. भारताच्या मैदानी प्रदेशातील लांडगे भुरकट रंगाचे असून त्यांच्या अंगावर लहान मोठे काळे ठिपके असतात. तिबेट, लडाख आणि हिमालयाच्या उतरणीवरील लांडग्यांचा रंग कधी कधी काळसर असतो. हिवाळ्यात यांचा रंग करडा किंवा तकतकीत पिवळा असून अंगावर काळे व पांढरे अथवा काळे व पिवळे लांब केस असतात. उत्तर सायबीरिया आणि कॅनडामधील लांडगे जवळजवळ पांढरे असतात.


काश्मीरच्या पठरांवर, तिबेट आणि लडाखमध्ये ते भटके म्हणूनच असतात; हिवाळ्यात ते खाली दऱ्याखोऱ्यांत उतरतात व उन्हाळ्यात चरणाऱ्या प्राण्यांच्या कळपांबरोबर वर हिमरेखेकडे जातात. या भागात ते हिवाळ्यात बिळे किंवा गुहांत आणि उन्हाळ्यात वेतांच्या व झुडपांच्या दाट जाळ्यांत राहतात. वाळवंटातील लांडगे वाळूच्या टेकाडात विवरे करून राहतात. इतर ठिकाणी झुडुपांच्या जाळ्यांत ते राहतात. भक्ष्यांच्या शिकारीकरिता ते दिवसा किंवा रात्री बाहेर पडतात. मनुष्यवस्तीजवळ ते मुख्यतः गुरांवर हल्ला करतात व कधीकधी मुले पळवितात. जंगलात ते हरणे, कोल्हे, ससे इत्यादींची शिकार करतात. भुकेलेला लांडगा वाटेल त्या प्राण्यांवर ( माणसांवरही ) क्रूरपणे हल्ला करतो व ते मरण्याची वाट न पाहता त्यांचे लचके तोडून खातो. लांडगे जोडीजोडीने अथवा टोळ्यांनी शिकार करतात; बुद्धी, शक्ती व युक्ती यांचा मिलाफ याच्या ठिकाणी झालेला आढळतो.


नरमादी यांचा जोडा जन्मभर टिकतो. भारतात याच्या प्रजोत्पादनाचा मुख्य काळ पावसाळ्याच्या अखेर असतो. गर्भावधी ६०-६३ दिवसांचा असून पिल्ले डिसेंबरमध्ये जन्मतात. एका वेळी ३-९ पिल्ले होतात. नरमादी त्यांची फार काळजी घेतात. त्यांची पूर्ण वाढ तीन वर्षांत होते. पिल्ले सहज माणसाळतात. लांडगा १२-१५ वर्षे जगतो.


संस्कृतीच्या उदयापासून मानव, त्याचे पाळीव प्राण्यांचे कळप व मोठे शिकारी प्राणी यांना लांडगा हा धोका ठरला आहे. त्यामुळे त्यांची चाकू, बंदूक, सापळे व विष यांसारख्या मिळेल त्या हत्याराने बेसुमार हत्या करण्यात आली आहे. अठराव्या शतकापर्यत ग्रेट ब्रिटनमधील लांडगे नष्ट करण्यात आले व आता पश्चिम व दक्षिण यूरोपात ते निर्वंश किंवा दुर्मिळ झाले आहेत. हीच स्थिती अमेरिका व दक्षिण कॅनडात आहे; तथापि तुरळक ठिकाणी ते आढळून येतात. उत्तरेकडे ते अजून आढळतात.


लांडग्याच्या लबाड स्वभावामुळे बऱ्याच अंधश्रद्धा, दंतकथा व लोककथांना जन्म दिला गेला आहे. कधीकधी जंगलात राहणाऱ्या माणसांनी लांडग्याची पिल्ले छंद व जोडीदार म्हणून पाळली आहेत. एकेकाळी लांडग्यांचे कातडे माणूस पोषाखासाठी वापरीत असे व दुष्काळी परिस्थितीत त्याचे मांस अन्न म्हणून खात असे.


रानटी लांडग्याच्या मादीचा पाळीव कुत्र्याशी संयोग होतो व त्यांच्यापासून फलनक्षम संकरित प्रजा निर्माण होते. वस्तुतः शतकानुशतकांच्या निवड संकर पद्धतीने यूरोपीय लांडग्यापासून कुत्र्यांचे संकर तयार झाले आहेत.