एका पडक्या किल्ल्याचे मनोगत
Marathi Nibandha on Fort |
रायगड म्हणजे मराठी मनाचा मानबिंदूच! या रायगडाच्या भेटीसाठी माझे मन विलक्षण आतुर झाले होते आणि काय योगायोग पाहा! आमच्या महाविदयालयाची सहल नेमकी रायगडावर नेण्याचे निश्चित झाले.
आम्ही रायगडावर पोहोचलो तोच माझ्या कानांवर धीरगंभीर शब्द आदळले, "अरे, मित्रा थांब थांब ! एवढ्या आतुरतेने मला भेटण्यासाठी आलास, तेव्हा मला तुझे स्वागत केलेच पाहिजे." प्रत्यक्ष रायगड माझ्याशी बोलत असल्याचे मला जाणवले. रायगडाचे आर्त निवेदन माझ्या कानी पडत होते.
" अरे दोस्ता, तुझ्यासारखी माझ्यावर नितांत प्रेम करणारी मंडळी फारच थोडी ! बहुतेक माणसे सहलीच्या निमित्ताने येतात आणि धुमाकूळ घालतात. त्यामुळे या ऐतिहासिक वास्तूत येऊनही त्यांचे माझ्याकडे लक्षच नसते. मित्रा मी माझ्या या जीर्ण, थकलेल्या मनात केवढ्या आठवणी जतन करून ठेवल्या आहेत म्हणून सांगू ! ज्या पर्वतावर मी आज अनेक वर्षे उभा आहे, तो हा सह्याद्री म्हणजे 'स्वातंत्र्याचा रखवालदार" आहे. अनेक गड, किल्ले आजही त्याच्या भक्कम अंगाखांद्यावर दिमाखाने उभे आहेत... या महाराष्ट्रभूमीचे रक्षण करायचे, हेच त्यांचे जीवनध्येय आहे. आजवर अनेक आक्रमणांना त्याने आपल्या निधड्या छातीने थोपवून धरले. याच्या मजबूत खांदयावर उभे राहून स्वातंत्र्यासाठी चाललेल्या संघर्षाचा क्षण मी डोळे भरून पाहिला आहे आणि क्षणोक्षणी रोमांचित झालो आहे..
"हिंदवी स्वराज्य स्थापन झाल्यावर छत्रपतींनी राजधानी म्हणून जेव्हा माझी निवड केली, तेव्हा मला जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटले. आता त्या शूरवीर राजाचा सहवास आपल्याला लाभणार या कल्पनेने मी हर्षभरित झालो. पण त्या महात्म्याला फारशी उसंत मिळाली नाही. तो महापुरुष अनेकविध कामांत गुंतलेला असायचा.
"महाराज गेले आणि सारी रयाच गेली माझी लबाईच्या वेळच्या तोफांचे भय मला कधीच वाटले नव्हते. पण घरभेदी माणसांची कटकारस्थाने माझे मन विदीर्ण करीत. असे हे स्वकीय! महाराज निवर्तल्यावर ते येथे येत आणि जागोजागी माझे शरीर खणून काढत. त्यांना वाटे, येथे महाराजांच्या वेळचे धन मिळेल. त्या वेड्यांना हे कळले नाही की, खरे धन महाराजांनी महाराष्ट्रात घरोघर वाटले होते; ते अक्षय धन होते ज्वलंत राष्ट्रभक्तीचे !
" याची उमज फारच थोड्यांना आली. निबंधकार शिवरामपंत परांजपे यांच्या दृष्टीस राष्ट्रभक्तीचे ते धन पडले आणि त्याच्या तेजाने ते दिपून गेले. इतिहासप्रेमी गो. नी. दांडेकर यांना ते भावले. ब. मो. पुरंदरे त्या धनसंपत्तीने तृप्त झाले. आपल्या बंगल्यांना वा प्रदेशांना माझे नाव देऊन काय होणार ? त्यासाठी हवी त्या थोर राजासारखी प्रखर देशनिष्ठा, त्याच्यासारखे उज्ज्वल चारित्र्य! पण आजकाल त्याचाच अभाव आहे आणि हीच माझी व्यथा आहे, खंत आहे. "
रायगडाचे मनोगत ऐकत महाराजांच्या समाधीसमोर आलो, तोच रायगडाचा धीरगंभीर आवाज बंद झाला; आसवांच्या फुलांची ओंजळ महाराजांच्या स्मृतीला वाहून मी त्या थोर महात्म्याच्या समाधीला वंदन केले.
...मराठी निबंध !