adsense

जिराफ विषयी संपूर्ण माहिती : Giraffe Information in Marathi

 जिराफ 

Giraffe Information in Marathi


जिराफ : समखुरीय गणाच्या (ज्यांच्या बोटांची किंवा खुरांची संख्या सम असते अशा प्राण्यांच्या गणाच्या) जिराफिडी कुलातील प्राणी. याचे जीवाश्मी (शिळारूप झालेले) अवशेष ग्रीस, दक्षिण रशिया, आशिया मायनर, भारत, चीन आणि आफ्रिकेत आढळले आहेत; यावरून पुरातन काळी हा सर्व पृथ्वीतलावर होता असे म्हणता येईल. हल्ली मात्र त्याची वसती फक्त आफ्रिकेत सहाराच्या दक्षिणेस आहे. जलद गतीने चालणारा या अर्थाच्या ‘झरापा’ या अरबी शब्दापासून जिराफ हा शब्द आलेला आहे.


जिराफाची एकच जाती हल्ली अस्तित्वात आहे. तिचे शास्त्रीय नाव जिराफा कॅमेलोपार्‌डॅलिस आहे. याच्या कित्येक प्रजाती असून स्थानपरत्वे त्यांना नूवियन जिराफ, केप जिराफ, सोमाली जिराफ इ. नावे मिळाली आहेत. जिराफ गवताळ रानात राहतात.


जिराफ (जिराफा कॅमेलोपार्‌डॅलिस)


हा जगातील सर्वांत उंच चतुष्पाद आहे. डोक्यासहित धडाची लांबी ४ मी.; शेपटीची ८६ सेंमी.; खांद्यापाशी उंची ३–४ मी.; वजन ५५०–१,८०० किग्रॅ.; सर्वसाधारण रंग पिवळसर, त्यावर काळसर तांबूस रंगाची विविध आकारांची व आकारमानांची चकदळे असतात. खालची बाजू फिक्कट रंगाची असून तिच्यावर ठिपके नसतात. याची मान खूप लांब असून नराच्या मानेवर ताठ उभ्या केसांची आयाळ असते. नर व मादीच्या डोक्यावर आखूड, बोथट शिंगांच्या एक किंवा दोन जोड्या असतात व शिंगांवर जाड त्वचेचे आवरण असते. शिंगे १०–१५ सेंमी. लांब; शेपूट झुपकेदार; पाय लांब, मजबूत आणि पुढचे पाय मागच्यांपेक्षा जास्त लांब असतात. प्रत्येक पायाला दोन मोठे खूर असतात. जीभ सु. ४५ सेंमी. लांब व ती तोंडाच्या बाहेर काढता येते; झाडांची पाने तोडण्याकरिता तिचा उपयोग होतो. त्याचे घ्राणेंद्रिय, श्रवणेंद्रिय व दृष्टी तीक्ष्ण असते. डोळे मोठे, गडद तपकिरी रंगाचे व कान लांब असतात. जिराफाला आवाज काढता येत नाही अशी समजूत आहे, पण तो कण्हल्यासारखा किंवा बेंबें असा बारीक आवाज काढतो.


जिराफ भित्रा, गरीब, शांत व निरुपद्रवी आहे. यांचे १२–१५ जणांचे टोळके असते; कधीकधी ७० प्राण्यांचा मोठा कळप असतो. कळपात एक पुढारी प्रौढ नर, माद्या, लहान मोठी पिल्ले आणि निरनिराळ्या वयांचे नर असतात; टेहळणीचे काम माद्या करतात. जिराफ ताशी ४७ किमी. वेगाने धावू शकतो; धावताना शेपटी पाठीवर उभारलेली असते.


स्वसंरक्षणाकरिता जिराफ शत्रूला पायांनी जबरदस्त फटकारे मारतो; पण मादीकरिता होणाऱ्या नरांच्या झुंजीत ते डोके आणि मान यांचाच उपयोग करतात.


जिराफ उभा राहूनच झोप घेतो. पाणी पिताना किंवा जमिनीवरील भक्ष्य खाताना मान जमिनीपर्यंत पोहोचावी म्हणून जिराफांना पुढचे पाय फाकावे किंवा गुढघ्यात वाकवावे लागतात. सकाळ संध्याकाळ ते चरतात आणि दुपारी विश्रांती घेतात.


जिराफ रवंथ करणारे प्राणी आहेत. अ‍ॅकेशिया (बाभळीच्या वंशातील), जंगली जरदाळू वगैरे झाडांची पाने ते खातात. पाणी मिळण्यासारखे असले, तर प्रसंगोपात ते पाणी पितात; पण पाण्याशिवाय ते महिनाभरसुद्धा राहू शकतात.


त्यांच्या प्रजोत्पादनाचा काळ जुलैपासून सप्टेंबरपर्यंत असतो आणि गर्भावधी १४–१५ महिन्यांचा असतो. मादीला दर खेपेस एकच पिल्लू होते. जन्मल्यानंतर दोन तासांनी ते आईबरोबर हिंडू लागते. जिराफ १५–२० वर्षे जगतो.