adsense

एक वृद्ध नट : Marathi Nibandha

एक वृद्ध नट


marathi eassy
Marathi Nibandha 


दादा सरंजामे म्हणजे एकेकाळचे एक बड़े प्रस्थ गावातील जमीनदारो वाडवडलांपासून चालत आलेली. भला मोठा वाडा, गुरांनी भरलेला गोठा व घरात माणसांची सारखी वर्दळ. त्यांत खरी नात्याची थोडी पण स्वार्थासाठी गोळा झालेली पुष्कळ, तसे दादा आपल्या आईवडलांचे एकुलते एक चिरंजीव. पण दादांनी कधी स्वतःचा असा संसार मांडलाच नाही. लहानपणापासून त्यांना ओढ नाटकांची, नाटक कंपनीची आणि नाटक कंपनीतील माणसांची तरुणवयात तर दादांची पथारी नाटक कंपनीतच असे. इतर नटांना शाबासकी देता देता दादांनी कधी तरी एकदा आपल्याच तोंडाला रंग फासला आणि त्यानंतर तो आयुष्यभर कधी पुसलाच नाही.

दादा आपल्या सरंजामाला विसरले. जमीनदारीची त्यांना आठवण राहिली नाही. ते आपल्या घरापासून दूर नाटक कंपनीबरोबर हिंडत राहिले. मायेची माणसे देवाघरी गेली. आणि लबाड लोकांनी जमीनदाराचे सारे घर धुवून नेले. पण दादांना त्याची खंत वाटत नव्हती. ते खरेखुरे जीवन जगत होते. नाटकात ते कधी शिवाजी झाले, तर कधी संभाजी झाले. ते कधी नायकाच्या रूपात दिसत, तर कधी खलनायकाच्या रूपात वावरत. दादांनी खूप धन मिळवले आणि दानधर्म करण्यात ते खर्चही केले. कधी उद्याचा विचार केला नाही. आणि धनसंपत्तीचा संचय केला नाही.

जेव्हा त्यांचे हातपाय थकले, रंगमंचावर पाय लटपटू लागले तेव्हा घराच्या ओढीने दादा गावाकडे वळले. पण घरात उरले होते काय? केवळ मोडकळीस आलेला तो वडिलोपार्जित वाडा, तोही वाडा सावकाराकडे गहाण पडलेला. पण दादा डगमगले नाहीत. तेथेच एका खोलीत दादांनी आपला बाडबिस्तारा टाकला. दादांना ओळखणारी माणसे आता गावात फारशी नव्हतीच. पण दादांना त्याची पर्वा नव्हती. लहान लहान मुले गोळा करून ते त्यांना अभिनयाचे पाठ देऊ लागले.

एकदा आमच्या शाळेत नाटक बसवायचं होतं- 'पुरंदरची दिवाळी.' मी सरांना विचारून मित्रांसह दादांकडे मार्गदर्शनासाठी गेलो आणि दादांनी मोठ्या आनंदाने नाटकाचे दिग्दर्शन करण्याचे मान्य केले. त्यांच्या खोलीत आमच्या तालमी झडू लागल्या. त्या वर्षीचे आमचे नाटक मोठे झकास झाले. दादा स्वतः नाटक बघायला आले होते. इतकेच नव्हे तर त्यांनी आम्हांला बक्षिसेही दिली.

तेव्हापासून माझी दादांशी दोस्ती झाली. मी नेहमी त्यांच्या खोलीवर जातो. नाटक हा आमच्या गप्पांचा नेहमीचा विषय असतो. दादा त्यांच्या वेळच्या नाट्यक्षेत्रातील हकीकती। सांगतात. दादांना मिळालेली मानपत्रे, बिल्ले, शेले त्यांनी जपून ठेवले आहेत. मोठया कौतुकाने दादा त्या वस्तू मला दाखवतात, नवीन नाटकांबद्दलही दादांना फार कौतुक! नाट्यक्षेत्रात चालणारे नवनवे प्रयोग दादा कुतूहलाने पाहतात. नुकतीच दोन वर्षे झाली, दादांना महाराष्ट्र सरकारचे निवृत्तिवेतन मिळू लागले आहे. दादांना त्याचे विशेष कौतुक करले नाही पण जेव्हा आजच्या रंगभूमीवरचा एक तरुण नाणावलेला नट दादांकडे आशीर्वादासाठी आला, तेव्हा दादांना रंगभूमीवरील आपल्या तपस्येचे सार्थक झाल्याचा आनंद वाटला.

...मराठी निबंध