adsense

फेक न्यूज शेअर करून केली जातेय जनतेची दिशाभूल

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पार्टीचे सदस्य सर्वाधिक फेक न्यूज शेअर करतात असा दावा संशोधकांनी केला आहे. डेमोक्रॅट्स पक्षाच्या तुलनेत त्यांचे प्रमाण ९ पटीने जास्त. ऑस्ट्रियाच्या ग्रॅज युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी व ब्रिटनच्या ब्रिस्टल युनिव्हर्सिटीच्या एका संशोधनातून हा दावा करण्यात आला आहे की रिपब्लिकन पार्टीद्वारे शेअर करण्यात आलेल्या ट्वीटमध्ये संशयित संकेतस्थळांची संख्या ४ वर्षांत दुपटीवर गेली आहे. २०१६ ते २०१८ दरम्यान ही संख्या २.४ टक्के होती, तर २०२० ते २०२२ दरम्यान त्यात ५.५ टक्क्यांवर गेली आहे. या संयुक्त प्रकल्पाचे प्रमुख डॉ. जाना लास्सर म्हणाले, सोशल मीडियावर राजकीय नेत्यांनी शेअर केलेल्या धक्कादायक माहितीचा पूर येत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा त्यात प्रचंड वाढ झाली आहे.

संशोधनात सहभागी देशांतील कट्टरतावादी नेत्यांनी अशा प्रकारच्या बातम्या जास्त प्रमाणात शेअर केल्या आहेत. परंतु अमेरिकेत माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पार्टीच्या नेत्यांच्या ट्वीटमध्ये जास्त वाढ झाल्याचे दिसून आले आहे. या संशोधनासाठी २०१६ ते २०२२ दरम्यान नेत्यांकडून करण्यात आलेल्या सुमारे ३४ लाख ट्वीटचे विश्लेषण करण्यात आले आहे. त्यात अमेरिकन खासदारांचे १७ लाख ट्वीट, ब्रिटन संसद सदस्यांचे सुमारे १० लाख ट्वीट व जर्मनीच्या खासदारांच्या ७.५ लाख ट्वीटचाही समावेश आहे. ब्रिस्टल विद्यापीठातील मानस विभागाचे अध्यक्ष प्रो. स्टीफन लेवांडोव्हस्की म्हणाले, नेते शिक्षित वर्गात येतात. लोक त्यांच्याकडून प्रेरणा घेत असतात. अप्रामाणिक बातम्या पोस्ट करून ते आपली राजकीय पोळी भाजण्याचे काम करतात.