adsense

एक थोर संत - संत एकनाथ : Sant Eknath Biography in Marathi

एक थोर संत - संत एकनाथ


Sant eknath
Sant Eknath Maharaj Mahiti


         आपल्या समाजाला लागलेला अस्पृश्यतेचा कलंक पूर्णत: पुसून टाकायला हवा. आजही जन्मावरून माणसांत उच्चनीचता मानली जाते. अशा वेळी मनात येते, स्वर्गातील एकनाथांच्या आत्म्याला काय वाटत असेल ? चारशे वर्षांपूर्वी नाथांनी प्रत्यक्ष कृतीद्वारा समाजाला समानतेची व मानवतेची शिकवण दिली होती.


         इ. स. १५३३ मध्ये सुविदय, भाविक अशा चक्रपाणींच्या घरात संत एकनाथांचा जन्म झाला. नाथांच्या घराण्यात विठ्ठलभक्ती फार पूर्वीपासून रुजलेली होती. त्यांच्या आजोबांनी म्हणजे संत भानुदासांनी कर्नाटकातून पांडुरंगाची मूर्ती पंढरीला आणली. नाथांन तर अगदी बालपणापासून परमेश्वरप्राप्तीचे वेड लागले होते. त्यासाठी त्यांनी वयाच्य बाराव्या वर्षीच घराचा त्याग केला आणि ते देवगडला आपल्या गुरुगृही, जनार्दनस्वामींकडे आले. जनार्दनस्वामींनी नाथांची परीक्षा घेतली. नाथ त्या कसोटीला उत्तम प्रकारे उतरले. तेव्हा त्यांना गुरूचा अनुग्रह मिळाला.

 
       नाथ विद्वान होते, ज्ञानी होते; पण दुराग्रही नव्हते. धर्म व रूढी यांतील फरक त्यांन जाणला होता. सनातनीपणाचे पांघरूण पांघरणारे लोक माणुसकीपासून दूर जात आहेत. हे नाथांनी ओळखले. संस्कृत भाषेचा त्यांचा उत्तम अभ्यास होता. तिची थोरवी ते जाणत होते; पण त्याचबरोबर मराठीची महत्ताही त्यांनी जाणली होती. त्यामुळे त्यांनी कर्मठ समाजाचा रोष पत्करूनही सामान्य जनांसाठी मराठीत प्रासादिक रचना केली. त्यांनी अविश्रांत परिश्रम घेऊन ज्ञानेश्वरांच्या भावार्थदीपिकेचे शुद्धीकरण केले व तिच्यातील पाठभेद काढून टाकून 'ज्ञानेश्वरी' सिद्ध केली. नाथांनी भागवताची रचना केली व भावार्थ रामायणातून रामकथा सांगितली. 'रुक्मिणी स्वयंवर' हा त्यांच्या पंडिती काव्याचा. उत्कृष्ट नमुना आहे. नाथांनी ही सर्व रचना मराठीत केली. नाथांच्या या मराठी रचनेला काशीच्या पंडितांनी प्रारंभी विरोध केला; पण ग्रंथ श्रवण केल्यावर त्याच पंडितांनी नाथांच्या ग्रंथाची काशीत मिरवणूक काढली.


            नाथ संत होते, कवी होते, तसेच ते श्रेष्ठ समाजसुधारक होते. समाजातील चातुर्वर्ण्य पद्धत व त्यामुळे समाजातील विशिष्ट वर्गावर होणारा अन्याय त्यांना मान्य नव्हता. रणरणत्या वाळूत रडणाऱ्या हरिजन बालकाला त्यांनी उचलून घेतले व त्याला महारवाड्यात नेऊन पोचवले. एवढेच नव्हे, तर त्यांनी स्वतःच्या वडलांच्या श्राद्धाला महारांना आपल्या घरी पंक्तीला जेवायला बोलावले. काशीहून आणलेली गंगा तहानलेल्या गाढवाला पाजली. हे सारे नाथ करू शकले; कारण जनता हाच त्यांचा जनार्दन होता व जनसेवा हीच त्यांना ईश्वरपूजा वाटत होती.