adsense

मासे विकणाऱ्या कोळिणीचे मनोगत : Marathi Nibandha

मासे विकणाऱ्या कोळिणीचे मनोगत


kolin bai
Kolin Bai

'आज 'जागतिक महिला दिन' आहे, म्हणून आपण सगळ्याजणी येथे जमलो आहोत आणि या सर्व मोठमोठ्या अधिकारी स्त्रिया मला आज भाषण करायला सांगत आहेत. मी रोज मार्केटात बसून मासे विकते, तेव्हा माझ्या गिन्हाइकांशी खूप बोलते, अगदी वादही घालते. माझ्याकडचे मासे किती चांगले आहेत आणि त्यांचा भाव कसा योग्य आहे, हे मी गिन्हाइकांना बरोबर पटवून देते. पण भाषण करण्याची मला सवय नाही. पण या मोठ्या ताई म्हणाल्या, 'तू तुझं मनोगत सांग. म्हणजे तुझ्या मनात जे जे येतं ते बोल.' आता त्यांचं मन कसं मोडायचं ? म्हणून मी जे सुचेल ते बोलते.

" मी बाजारात बसून मासळी विकते. त्यासाठी मी महानगरपालिकेच्या कचेरीतून परवानगी काढली आहे. माझी आईपण मासळी विकत होती. माझी आजीपण हेच काम करीत होती. सांगायचं कारण हेच की, पिढ्यानपिढ्या आमचा हाच धंदा. आता आमच्या मुली बाळी शिकत आहेत, त्या पुढे हा व्यवसाय करतील की नाही, हे मला सांगता येणार नाही, आणि खरं सांगू का ? त्यांनी या धंद्यात येऊच नये, असं वाटतं. कारण आता या धंदयात काही राम राहिलेला नाही.

'आमच्या घरातील पुरुषमंडळी आपल्या नावा घेऊन खवळलेल्या समुद्रात मच्छीमारी करण्यासाठी जातात. त्या वेळी आमचा जीव टांगणीला लागलेला असतो. कारण, या कामात अनेक वेळा खूप धोके येतात. कधी दर्या उफाळतो, तर कधी वादळ होतं. नाव परत येईपर्यंत बेचैनी मग त्यांनी आणलेली मासळी वेगळी वेगळी करून आम्ही विक्रीला निघतो, टोपलीत बर्फ घालावा लागतो. कारण लवकर खराब होणारा हा माल बाजारात गिन्हाइकांशी चालणारी घासाघीस तर सर्वांना माहीतच आहे. भांडखोर म्हणून आम्हांला नावं ठेवली जातात, पण एवढ्या कष्टाचं हे जगणं म्हणून जीभ थोडी तिखट होते ! पण काही गिन्हाइके आमच्या सचोटीमुळे आमच्याशी कायमची बांधली गेली आहेत.

'वर्षानुवर्षे चाललेल्या आमच्या या व्यवसायात आता अडचणी उभ्या राहत आहेत. बाहेरून कुठून कुठून आलेले काही फेरीवाले विक्रेते दारोदार जाऊन मासळी विकतात. त्यामुळे मार्केटात मासे खरेदीला येणाऱ्यांची संख्या घटते. ते हलक्या प्रकारची.. मासळी स्वस्तात विकतात आणि लोक फसतात. शिवाय या फेरीवाल्या विक्रेत्यांना महापालिकेची परवानगी काढावी लागत नाही वा जागेचं भाडंही दयावे लागत नाही. पण याचा आमच्या धंदयावर परिणाम होतो. मध्यंतरी आम्हांला त्यांच्याशी झगडावं लागलं.

'दुसरं मोठं संकट म्हणजे मासेमारीच्या धंदयात उतरलेल्या मोठ्या कंपन्या या कंपन्या मोठमोठ्या बोटी घेऊन खोल समुद्रात जातात व भरपूर मासे पकडतात. मग आमच्या मंडळींना मासे मिळत नाहीत. शिवाय काही कारखाने समुद्रात, खाडीत, नदीत दूषित पाणी सोडतात. त्यामुळे मासे मरतात, त्याचा विचार करून केवळ मासे- उत्पादनासाठी स्वतंत्र जलक्षेत्र राखीव करायला हवे. शासनाने यात मुद्दाम लक्ष घालायला हवं.

" मैत्रिणींनो, अजून एक दुःखद गोष्ट मला सांगायची आहे आणि ती म्हणजे आमच्या समाजातील पुरुषांतील वाढती व्यसनाधीनता. त्याविरुद्ध आम्ही सर्व स्त्रियांनी उठाव करण्यास सुरुवात केली आहे. त्यात आम्हांला तुमची मदत हवी आहे. आम्हांला आमच्या नव्या पिढीला या व्यसनापासून वाचवायचे आहे. आमचा धंदा वाचवून तो अधिक विकसित करायला हवा. आमचे सण म्हणजे नारळी पुनव आणि होळी. आमचे नाच पाहायला, गाणी ऐकायला तुम्ही होळीला आमच्या वस्तीवर जरूर जरूर या !"

...मराठी निबंध !