adsense

नागा विषयी माहिती : Cobra Information in Marathi

◆ नाग

Cobra information in marathi
Nagachi Mahiti Marathi


नाग हा एक विषारी साप आहे. नागाचा वावर मुख्यत्वे आशिया व आफ्रिका खंडातील उष्ण प्रदेशात आहे.


रचना


नागाची ओळखण्याची सर्वांत मोठी खूण म्हणजे त्याचा फणा. नागाच्या डोक्यामागील काही बरगड्या अतिशय लवचीक असतात त्यामुळे नागाला फणा काढणे शक्य होते. नागाचा फणा काढण्याचा अर्थ म्हणजे संकट काळी आपली छबी मोठी करून समोरील प्राण्यांना घाबरवणे. नागाच्या साधारणपणे ६-८ बरगड्या फणा काढण्यालायक असतात. फण्याच्या मागील बाजूस देखिल विविध खुणा असतात. भारतातील नागांना फण्याच्या मागील बाजूस १० चा आकडा असतो, तर काहींना शून्याचा आकडा (monoclour) असतो. असे दाखवून नाग मोठे डोळे असल्याचे भासवतो. नाग हे अनेक रंगात आढळतात. काळा रंग व तपकिरी रंगातील नाग जास्त आढळतात. नागांना दोन विषारी दात असतात तसेच नागांचे विषारी दात हे दुमडू शकत नाहीत. नागाची लांबी बरीच, म्हणजे सरासरी लांबी १.२ ते २.५ मीटर असते. नागाच्या अंगावरील खवले हे घवाच्या(?) आकाराचे असतात.


खाद्य


उंदीर, बेडूक, सरडे, इतर छोटे प्राणी व पक्षी हे नागाचे मुख्य खाद्य आहे. आहेत. शेतीमधील उंदराचा मोठ्या प्रमाणावर फडशा पाडून नाग शेतकर्‍याला मदत करत असतात. माणूस हा नागाचा मुख्य शत्रू आहे. माणूस भीतीपोटी मोठ्या प्रमाणावर नागांना व इतर सापांना मारतो. इतर नैसर्गिक शत्रूंमध्ये मुंगूस, गरुड, कोल्हे, खोकड, अस्वले तसेच मोर इत्यादी आहेत. नाग शिकार करताना प्रामुख्याने आपल्या विषाचा उपयोग करतो. आपल्या भक्ष्याला चावल्यावर भक्ष्य मरेपर्यंत नाग वाट बघगतो व भक्ष्य मेल्यानंतर अथवा अर्धमेले असताना नाग तोंडाच्या बाजूने भक्ष्याला पूर्णपणे गिळतो. नाग आपली अंडी इतर प्राण्यांच्या बिळात टाकतो (आयत्या बिळात नागोबा ही मराठीत म्हण आहे!) व अंड्यातून पिल्ले बाहेर पडेपर्यंत पहारा देतो.


नागाच्या उपजाती


भारतीय नाग (Naja naja naja)नागाची सर्वाधिक आढळणारी जात ही भारतीय उपखंडात आढळते. याच्या फण्याच्या मागील बाजूस १० चा आकडा असतो भारतातील हिमालयातील मध्यम ते उंच रांगा सोडून ही जात सर्वत्र आढळते. प्रामुख्याने हे नाग शुष्क वातावरण जास्त पसंत करतात परंतु तसे त्यांचा वावर सर्वत्र असतो.


काळा नाग (Naja naja karachiensis) ही मुख्य नागाचीच उपजात आहे. ही जात प्रामुख्याने पाकिस्तानमध्ये व राजस्थानमध्ये आढळते. याचे संपूर्ण शरीर काळे असते तसेच मुख्य नागापेक्षा लांबीने लहान असतो व फणादेखील लहान असतो.


शून्य आकडी नाग प्रामुख्याने दक्षिण भारतात व आशियातील इतर देशात आढळतात. याच्या फण्यामागे शून्याचा आकडा असतो. फण्यामागील आकडा सोडला तर इतर सर्व गोष्टी मुख्य नागासारख्याच आहेत.


थुंकणारा नाग हा प्रामुख्याने आग्नेय आशियात म्हणजे थायलंड, मलेशिया, व्हिएतनाम व चीन या देशांत आढळतो. घनदाट जंगले व भातराशी हे त्याचे निवासस्थान आहे. नावाप्रमाणेच हा नाग आपल्या विषारी दातांमधून विषाची चिळकांडी आपल्या भक्ष्यावर उडवतो. भक्ष्याचे डोळे हे त्याचे मुख्य लक्ष्य आहे. विषाच्या प्रभावाने भक्ष्य तात्पुरते अंध होते व त्याचा फायदा घेऊन हा भक्ष्याची शिकार साधतो. डिस्कव्हरी चॅनेल वरील क्षणचित्रांमध्ये कित्येक मीटरपर्यंत हे नाग चिळकांडी उडवू शकतात असे दाखवले आहे.


नागराज (किंग कोब्रा) हा भारतातील पूर्व व दक्षिण भागात आढळणारा दुर्मीळ साप आहे हा नावाप्रमाणेच नागराज आहे. लांबीला सर्वाधिक व विषाच्या प्रभावात सर्वाधिक. याचे विषाने माणूस अर्ध्या तासाच्या आत मरू शकतो. दिसायला रुबाबदार असा हा साप लांबीला पाच ते साडेपाच मीटर असू शकतो. याचा फणा इतर नागांपेक्षा छोटा असतो. हा साप घनदाट जंगले पसंत करतो व कमीत कमी माणसाच्या संपर्कात येतो. अभ्यासकांच्या मते हा सर्वाधिक उत्क्रांत साप आहे. सापांमध्ये अतिशय दुर्मीळ असे सहचरी जीवन जगतो (काही काळापुरतेच) अंडी टाकण्यासाठी हा साप घरटे बांधतो. तसेच पिल्ले बाहेर येईपर्यंत अंड्याचे रक्षण करतो.


नागाचे विष


दरवर्षी हजारो माणसे नागदंशाने मरण पावतात. नाग चावला आहे या भीतीनेच बहुतांशी माणसे दगावतात. नाग हे माणसावर स्वतःहून आक्रमण करत नाहीत, केलाच तर त्याच्यामागे वसंरक्षण हाच हेतू असतो.. जर नागाचा आमने सामने झालाच तर आपले चित्त स्थिर ठेवणे हे सर्वोत्तम. आपली हालचाल कमीत कमी ठेवणे व जास्ती जास्त स्थिर रहाणे. हालचाल करायची झाल्यास नागाच्या विरुद्ध दिशेला अतिशय हळूवारपणे करणे. सर्वच नागदंश हे जीवघेणे नसतात काही वेळा कोरडा दंश देखील होऊ शकतो. साधारणपणे १० टक्के नागदंश हे जीवघेणे असतात. नागाचे विष हे मुख्यत्वे संवेदन प्रणालीवर neural systemवर परिणाम करतात. दंशानंतर लवकर मदत मिळाली नाहितर दंश जीवघेणा ठरू शकतो. दंश झाल्यानंतर काही वेळाने दंश झालेला भाग हा असंवेदनशील होतो व हळूहळू शरीराचे इतर भाग असंवेदनशील होण्यास सुरुवात होते. विषबाधा झालेल्ला माणूस विषदंशाचा भाग हलवण्यास असमर्थ होतो. विष शरीरात पसरल्यावर इतरही भाग हलवण्यास तो असमर्थ होतो. जीव मुख्यत्वे मेंदूद्वारे नियंत्रित श्वसन प्रणालीचे कार्य बंद पडल्याने जातो. विषाचा प्रादुर्भावाने जीव जाण्यास एक तास ते दीड दिवस लागू शकतो.


प्रतिविष


नाग चावल्यानंतर सर्वांत पहिले प्रथमोपचार होणे गरजेचे आहे. (पहा नाग चावल्यानंतरचे प्रथमोपचार )प्रथमोपचारानंतर साप चावलेल्या माणसाला प्रतिविषाचे इंजेक्शन देणे गरजेचे आहे. प्रतिविष हे विषाच्या रेणूंचा प्रादुर्भाव नाहिसा करते व शरीराच्या विषाचे रेणू शरीराच्या बाहेर काढायला मदत करते. विषाचे अंश शरीराच्या बाहेर पडेपर्यंत त्याचा प्रादुर्भाव रहातो. प्रतिविष हे देखिल नागाच्याच विषापासून बनवलेले असते.


भारतीय संस्कृतीतील नागाचे स्थान


गारुड्याकडील नाग


भारतीय संस्कृतीमध्ये नागाला भीतीयुक्त आदराचे स्थान आहे. महाराष्ट्रात श्रावण महिन्यात नागपंचमी साजरी केली जाते. या दिवशी महिला जिवंत नागाची पूजा करतात व नागाला दुधाचा प्रसाद दिला जातो. नागोबाला दूध म्हणून आरोळी देत गारुडी लोक गावांगावांत फिरत असतात व त्यादिवशी लोकांकडून अन्न धान्य, कपडा-लत्ता, पैसे घेतात. सांगली जिल्ह्यामधील ३२ शिराळा या गावी दरवर्षी नागपंचमी निमित्त मोठा सण आयोजित केला जातो[४]. हजारो नाग या दिवसाकरिता पकडले जातात. कित्येक पर्यटक केवळ हा सण पहायला या गावी जातात. गारुड्यांकडून पकडलेल्या या नागांचे मोठ्या प्रमाणावर हाल केले जातात असे लक्षात आले आहे. अजूनही यावर कायदा केला गेला नाही. काही संघटनांनी केलेल्या कार्यामुळे काही ठिकाणी नागपंचमीला केवळ नागाच्या प्रतिमेची पूजा केली जावी असे आवाहन केले आहे. त्याचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.


समुद्रमंथनासाठी लागलेली मंदार पर्वतापासून बनवलेली रवी घुसळण्यासाठी वासुकी नागाला दोरी म्हणून वापरले होते. हिंदू देवता शंकर यांनी सागरमंथना नंतर आलेल्या विषाचे प्राशन केले व त्यामुळे त्यांना गळ्यात प्रचंड जळजळ झाली. ह्या जळजळीपासून त्यांनी थंडावा मिळावा म्हणून नाग गळयाभोवती लपेटला व त्यांना विषप्राशन सहन करता आले, अशी कथा आहे. विष्णू हे सदैव शेषनागाच्या शय्येवर विश्राम घेत असतात असे पुराणात सांगितले आहे[५].महाभारतातील अर्जुनाने नाग जातीतील उलुपी नावाच्या मुलीशी लग्न केले होते.


डॉ. आंबेडकरांच्या मते महाराष्ट्रातील महार हे नागांचे वंशज आहेत. सातवाहन राजे नागकुलातले होते. ईशान्य भारतात बोलल्या जाणार्‍या गारो, खासी, बोडो आदी भाषा या नाग परिवारातील भाषा समजल्या जातात. नाग जमातीचे लोक भारताचे नागरिक आहेत; त्यांची वस्ती प्रामुख्याने नागालँड प्रांतात आहे.


हिंदू धर्मातील नवनाग स्तोत्रात नागाच्या नऊ नावांचा उल्लेख आहे. ते स्तोत्र खालीलप्रमाणे-


अनंतं वासुकीं शेषं पद्मनाभं च कंबलं |


शंखपालं धृतराष्ट्रं तक्षकं कलियं तथा||


एतानि नव नामानी नागानां च महात्मनां|


सायंकाले पठेन्नित्यं प्रातः काले विशेषतः||


तस्य विषभयं नास्ति सर्वत्र विजयी भवेत् |


या स्तोत्रात अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, कम्बल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालीय या नऊ प्रकारच्या नागांच्या नावांचा किंवा जातींचा उल्लेख आका आहे.


भारतातील एक जमात


पुराणकाळात भारतात नाग नावाची एक जमात होती, अजूनही असावी. हल्लीच्या नागालँड प्रांतात ते मोठ्या प्रमाणात होते, असे मानले जाते. डॉ. आंबेडकरांच्या मते महाराष्ट्रातील महार हे नागवंशीय आहेत.


गैरसमज


नागाच्या बाबतीत समाजात गैरसमज मोठ्या प्रमाणावर आहेत. खरेतर उंदरांसारख्या प्राण्यांचा मोठ्या प्रमाणावर फडशा पाडणारे नाग माणसाचे मित्र आहेत. परंतु माणूस आपल्याच चुकीने त्यांना डिवचतो व कधी कधी जीव गमावून बसतो. भारतात नागाला देवतेसमान जरी मानत असले तरी नाग किंवा कुठलाही साप दिसला तर मारायचाच हा प्रघात पडलेला आहे. नागाचे विष हे माणूस व नागाच्या शत्रुत्वामधील मुख्य कारण असले तरी इतरही अनेक गैरसमज भारतात आहेत खालीलप्रमाणे


नाग दूध पितो - वास्तविक नाग हा सस्तन प्राणी नाही, त्यामुळे नाग दूध पीत नाही.


नाग गारुड्याच्या पुंगीपुढे डोलतो - वास्तविक सापांना कान नसतात त्यामुळे गारुडी काय वाजवतोय हे नागाला कधीच कळत नाही. गारुडी पुंगी घेउन स्वतः हालचाल करीत असतो व त्या हालचालीला नाग फक्त प्रतिसाद देतो.


नागिणीला मारले तर नाग त्याचा सूड घेतो. (या सूडाला डूख धरणे असे म्हणतात.)


नागाच्या डोक्यामध्ये नागमणी असतो.


नागाला अनेक फणे असू शकतात.


चित्रपटातील गैरसमजुती


अनेक हिंदी चित्रपटांनी नाग व सापांबद्द्ल गैरसमज वाढवण्यास मदत केली आहे.


सर्वांत प्रसिद्ध चित्रपट १९८६ मधील श्रीदेवी, अमरीश पुरी व ऋषी कपूरचा नागिन आहे, ज्यामध्ये श्रीदेवी ही नागाचे तसेच मानवी रूप धारण करू शकत असते.


जॅकी श्रॉफचा 'दूध का कर्ज' हा चित्रपटसुद्धा नागांवर आधारित आहे. हा चित्रपट उपकार दुधाचे या मूळ मराठी चित्रपटावरून घेतलेला आहे.