adsense

कांगारू विषयी माहिती : Kangaroo Information in Marathi

कांगारू 

Kangaroo Information in Marathi

सस्तन प्राण्यांच्या शिशुधान गणातील महापाद्य (मॅक्रोपोडिडी) कुलातील प्राणी. कांगारू ऑस्ट्रेलियात (टास्मानियासह) आढळतात. सर्व शिशुधानी प्राण्यांमध्ये कांगारू सर्वांत मोठा आहे. मादी कांगारूच्या उदरावर असलेल्या पिशवीत पिलाची वाढ पूर्ण होते. कांगारूच्या लाल, नारिंगी आणि करडा अशा तीन जाती आहेत. लाल कांगारूचे शास्त्रीय नाव मॅक्रोपस रूफस नारिंगी कांगारूचे मॅक्रोपस रोबस्टस व करड्या कांगारूचे मॅक्रोपस जायगँटियस आहे.


सर्व कांगारू गवताळ सपाट प्रदेशात व वनात कळपाने राहतात. ते निशाचर असून दिवसा विश्रांती घेतात. ते गवत व झाडपाला खातात. कांगारूंच्या कळपात १० पेक्षा अधिक नर व माद्या असतात. त्यात वयाने व आकाराने मोठा असलेला नर प्रमुख असतो. कांगारूंना नैसर्गिक भक्षक फारसे नाहीत.


कांगारूची डोक्यासह शरीराची लांबी सामान्यतः ८०-१६० सेंमी.; शेपटीची ७०-११० सेंमी. आणि वजन सु. ५० किग्रॅ. असते. काही नर कांगारूंचे वजन ८५ किग्रॅ. पर्यंत आढळले आहे. अंगावरचे केस दाट आणि चरचरीत असतात. केसांचा रंग लालसर, तपकिरी, करडा अथवा काळसर असतो. कांगारूंची शेपटी मजबूत, बुडाशी जाड व टोकाकडे निमुळती होत जाते. बसताना शेपटीचा उपयोग पायासारखा होतो. मागचे दोन पाय आणि शेपटी सरळ जमिनीवर टेकून कांगारू बसतो. उडी मारताना शेपटीचा उपयोग सुकाणूसारखा आणि शरीराचा तोल सावरण्यासाठी होतो. मागचे पाय पुढच्या पायांपेक्षा बळकट आणि मोठे असतात. उड्या मारीत जाणे हे यांचे वैशिष्ट्य होय. एका उडीत तो २ मी. उंच अडथळाही पार करू शकतो. कांगारू ताशी ४८ किमी. वेगाने धावू शकतो. लांब पावलांमुळे उड्या मारणे सोयीचे असले तरी साधे चालणे मात्र त्याला अवघड जाते.


कांगारू हिवाळ्यात पिलांना जन्म देतात. गर्भावस्थेचा काळ ३०-४० दिवसांचा असतो. जन्माच्या वेळी पिलाची लांबी सु. ५ सेंमी आणि वजन सु. २७ ग्रॅ. असते. पिलू जन्मल्यावर मादी त्याला आपल्या ओठांनी उचलून शिशुधानीतील चारपैकी एका सडाला चिकटविते. पिलाला दूध चोखून प्यावे लागत नाही; सडातून ते त्याच्या तोंडात आपोआप येते. शिशुधानीत पिलू सु. ६ महिन्यांपर्यंत राहते. कांगारूंची आयुर्मर्यादा सरासरी ६-८ वर्षांचीच असली तरी ते २३ वर्षे जगल्याची नोंद आहे.


ऑस्ट्रेलियातील मूळ जमातींसाठी कांगारू अन्न, कातडी, हाडे इत्यादींसाठी उपयुक्त होते. यामुळे त्यांच्या कथा, लोकगीते व चालीरीती यांवर कांगारूंचा प्रभाव होता. यूरोपमधून वस्तीत आलेल्यांनी वृक्षतोड मोठ्या प्रमाणावर केली आणि चराऊ जनावरे पाळली. त्यामुळे कांगारूंच्या संख्येवर विपरीत परिणाम झाला. वाहनांच्या दिव्यांच्या प्रखर प्रकाशाने डोळे दिपल्याने ऑस्ट्रेलियातील महामार्गांवर वरचेवर अपघात होतात. कांगारू हा जीवसृष्टीतील शत्रूहीन प्राणी आहे. फक्त मनुष्य आणि कुत्रा यांपासून त्यांना धोका असतो. ऑस्ट्रेलियन सरकारने त्यांच्या शिकारीवर कायद्याने बंदी घातली असून त्याचे संरक्षण आणि संवर्धन करण्याचा प्रयत्‍न होत आहे.