adsense

गेंड्याची माहिती : Genda Information in Marathi

 गेंडा

Agenda Information in Marathi


ऱ्हिनोसेरॉटिडी कुलातील हा सस्तन प्राणी पूर्व आशिया आणि आफ्रिकेच्या उष्ण आणि उपोष्ण प्रदेशांतील गवताळ राने, दाट झुडपांचे प्रदेश आणि दाट अरण्ये यांत राहणारा आहे. या कुलाचा अवार्चीन विस्तार खंडित (एकमेंकापासून दूर असणाऱ्या प्रदेशांत आढळणे) आहे. हल्लीच्या सगळ्या जाती दुर्मिळ आणि नाहीशा होण्याच्या मार्गावर आहेत.

गेंड्याचे शरीर मजबूत व अवजड, डोके मोठे, शिंग एक किंवा दोन, मान आखूड आणि पाय खांबांसारखे पण आखूड असतात. चारही पायांवर प्रत्येकी तीन बोटे असून प्रत्येक बोट खुराने झाकलेले असते. काही जातींचा वरचा ओठ लोंबता व परिग्राही (पकड घेणारा) असतो. डोळे बारीक, डोक्याच्या बाजूंवर व कानापासून नाकपुडीच्या अंतराच्या मध्यावर असतात. कान आखूड, उभे असून त्यांच्या काठावर रोम (राठ केस) असतात. दृष्टी अधू पण कर्णेंद्रिय व घ्राणेंद्रिय तीक्ष्ण असते. त्वचा जाड असते; तिच्यावर सुरकुत्या असतात. काही जातींच्या त्वचेवर खोल दुमडी पडल्यामुळे ती खिळविलेल्या (रिव्हेट मारलेल्या) पत्र्यांच्या चिलखताप्रमाणे दिसते. शेपटीवर राठ केस असतात. मादी नरापेक्षा लहान असते.

गेंड्याची कवटी लांबट असते. नासास्थी (नाकाची हाडे) कवटीच्या बऱ्याच बाहेर आलेल्या असतात. अर्वाचीन गेंड्याच्या नाकावरील मध्यरेषेवर एक किंवा दोन शिंगे असतात; काही जातींत ती आखूड किंवा अस्पष्ट असतात; शिंग एकच असले तर ते नासास्थीवर असते; दोन असतील तर ती एकामागे एक असून मागचे ललाटास्थीच्या (कपाळाच्या हाडाच्या) वर असते; यांची निर्मिती चर्मापासून (कातडीच्या आतल्या थरापासून) होते आणि ती भरीव असली, तरी कॅरोटिनाच्या (एक प्रकारच्या न विरघळणाऱ्या प्रथिनांच्या) घट्ट तंतूंनी बनलेली असतात.

प्रजोप्तादनाचा काळ सोडून इतर वेळी गेंडा एकटा राहतो. गेंडा रात्रिंचर असून दिवसा सुरक्षित जागी विश्रांती घेतो. तो पाण्याच्या जवळपास राहतो. नद्यांच्या रेताड पात्रात वा चिखलट तळ्यात लोळणे त्याला आवडते. उभ्याने अथवा आडवा पडून तो झोप घेतो. गेंडा ताशी ४५ किमी. वेगाने धावू शकतो. सामान्यतः गरीब असणारा हा प्राणी कोंडीत पकडल्यावर क्रूर होतो.

झाडांच्या डहाळ्या, कोंब, पाने, बांबूंचे धुमारे, गवत इत्यादींवर गेंडे उदरनिर्वाह करतात.

प्रजोत्पादनाच्या काळात नर व मादी सु. चार महिने एके ठिकाणी राहतात. गर्भावधी ५१०-५७० दिवसांचा असतो. मादीला एकेवेळी एकच पिल्लू होते व जन्मल्यावर थोड्याच वेळात ते कार्यक्षम होते. मादीच्या पुढील वेतापर्यंत ते तिच्याबरोबर असते. गेंडा सु. ५० वर्षे जगतो. बेसुमार हत्येमुळे गेंडे दुर्मिळ होत चाललेले असल्याने हल्ली त्यांना कायद्याने संरक्षण देण्यात आले आहे.

गेंड्यांच्या पाच जाती जिवंत आहेत : दोन एकाच वंशातील आणि बाकीच्या तीन वेगवेगळ्या तीन वंशांतील आहेत.

मोठा भारतीय गेंडा

हा पश्चिम बंगाल, आसाम आणि नेपाळमध्ये आढळतो. शास्त्रीय नाव ऱ्हिनोसेरॉस यूनिकॉर्निस. सर्वांत मोठ्या गेंड्यांपैकी हा एक आहे. डोक्यासहित लांबी २ — ४ मी., सरासरी उंची १ — २ मी., एकच शिंग असून त्याची सरासरी लांबी ३८— ४१ सेंमी.; त्वचा जाड; तिच्यावर केस नसतात पण गुठळ्या असतात. कातडीवर खोल सैल दुमडी असल्यामुळे अंगावर चिलखत असल्याचा भास होतो. अंगावर तीन मोठ्या दुमडी असतात : एक खांद्याच्या पुढे, दुसरी त्याच्या मागे व तिसरी मागच्या पायांच्या पुढे. मागच्या दोन दुमडी एका बाजूकडून पाठीवरून दुसऱ्या बाजूला जातात.

हा एकलकोंडा आहे. गवत याचे मुख्य अन्न होय. विणीचा हंगाम ठराविक नसतो. मादीप्रमाणेच

नरालाही ‘माज’ येतो आणि दोघांचा हा काळ जुळल्याशिवाय त्यांची जोडी जमत नाही.

पितरांना गेंड्याचे मांस व रक्त प्रिय असते, अशी नेपाळमध्ये समजूत असल्यामुळे उच्चवर्णीय हिंदू व गुरखे त्यांना हे पदार्थ अर्पण करतात; श्राद्धाच्या दिवशी याच्या शिंगाच्या पेल्यातून अर्घ्य देणे पवित्र मानतात. गेंड्याचे मूत्र जंतूनाशक असते अशीही समजूत आहे. भुतेखेते आणि रोगराई यांचे निवारण करण्याकरिता मूत्र भांड्यात घालून ते मुख्य दारावर टांगून ठेवतात. अशाच समजुती ब्रह्मदेश, सयाम आणि चीनमध्ये प्रचलित आहेत. या प्राण्याच्या बेसुमार हत्येचे हेही एक कारण आहे.

जावा गेंडा

शास्त्रीय नाव ऱ्हिनोसेरॉस सोंडेइकस. भारतीय गेंड्यापेक्षा लहान. फक्त नरालाच शिंग असून ते सरासरी २७ सेंमी लांब असते; उंची १·८ मी.; त्वचेवर खवल्यांसारख्या लहान बहुकोनी चकत्या असतात. हा एकेकाळी बंगाल, आसाम, ब्रह्मदेश,मलाया द्वीपकल्प व सुमात्रामध्ये विपुल होता; पण हल्ली तो भारत व ब्रह्मदेशातून लुप्त झाला आहे. फक्त जावातील उडजुंग आश्रयस्थानात या जातीचे २५ — ३० गेंडे आहेत.

आशियातील दोनशिंगी गेंडा

डायडर्मोसेरस सुमात्रेन्सिस. जिवंत गेंड्यांमध्ये

सगळ्यांत लहान. आसामच्या डोंगराळ दाट अरण्यात हा हल्ली क्वचित आढळतो. ब्रह्मदेशात हे गेंडे थोडे आहेत. हा गेंडा सयाम, मलाया व सुमात्रातही आढळतो. उंची १ — १·५ मी.; याला एकामागे एक अशी दोन शिंगे असतात; मादीचे पुढचे शिंग १५ सेंमी. व मागचे ५ सेंमी. लांब असते; नराची शिंगे याच्या तिप्पट लांब असतात. त्वचेवर केस व वळ्या असतात. झाडाझुडपांचे कोंब, डहाळ्या आणि गळून पडलेली फळे हा खातो. वरचेवर चिखलात लोळणे याला आवडते.

आफ्रिकेतील ‘काळा गेंडा’

शास्त्रीय नाव डायसेरॉस बायकॉर्निस. पूर्व व दक्षिण आफ्रिकेत आढळतो. उंची सु. १·५ मी.; याला एकामागे एक अशी दोन मोठी शिंगे असून क्वचित मागच्या शिंगाच्या मागे तिसऱ्या शिंगाचा अंकुर आढळतो; पुढचे शिंग सु. १ मी. व मागचे ०·५ मी. असते. वरचा ओठ टोकदार, लोंबता; रंग काळा; झाडांच्या डहाळ्या व पाने खातो. हा तापट आणि आक्रमक वृत्तीचा असून माणसे व वाहने यांवर हल्ले चढवितो. सोमाली लोक याच्या कातड्याच्या ढाली करतात.

आफ्रिकेतील ‘पांढरा’ गेंडा

शास्त्रीय नाव सेरॅटोथेरियम सायमम. हत्तीच्या खालोखाली मोठा;  उंची १·५ — २ मी.; लांबी ३·५-५ मी.; याला दोन शिंगे असून पुढचे मागल्यापेक्षा बरेच मोठे असते. पुढच्या शिंगाची लांबी १८० सेंमी.पर्यंत, मागच्याची ४० सेंमी.पर्यंत; रंग पिवळसर बदामी; अंगावर केस नसतात. गवत व झुडपांवर उपजीविका; नरमादीची जोडी किंवा कुटुंबांचे लहान गट आढळतात. हा हल्ली दक्षिण सूदान, युगांडा, त्याच्या लगतच्या कांगोचा भाग आणि झुलुलँडची राखीव जंगले यांत आढळतो.