adsense

प्रकाश आंबेडकर यांचे जीवनचरित्र - Prakash Ambedkar Biography in Marathi

प्रकाश आंबेडकर

         प्रकाश आंबेडकर यांना बाळासाहेब आंबेडकर म्हणूनही ओळखले जाते. ते एक भारतीय राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते, लेखक आणि वकील आहेत. तसेच ते तीन वेळा खासदार (MP) झाले. ते भारताच्या 12 व्या आणि 13 व्या लोकसभा अकोला मतदार संघाचे सदस्य होते. त्यांनी भारतीय संसदेच्या दोन्ही सभागृहात काम केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ते नातू असल्याने त्यांना प्रेरित असल्या वंचित बहुजन आघाडीचे ते संस्थापक व अध्यक्ष आहेत.

Prakash ambedkar
Prakash Ambedkar Mahiti


◆ वैयक्तिक जीवन

          प्रकाश आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि रमाबाई आंबेडकर यांचे थोरले नातू आहेत. त्यांच्या वडिलांचे नाव यशवंत आंबेडकर (भैय्यासाहेब) आणि आईचे नाव मीरा आहे. आंबेडकर कुटुंब नवयना बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत. त्यांना दोन धाकटे भाऊ भीमराव, आनंदराज आणि एक बहिण रमाबाई असून तिचे लग्न तेलतुंबडे यांच्याशी झाले आहे. प्रकाश आंबेडकर यांचे लग्न 27 नोव्हेंबर 1993 रोजी ब्राह्मण कुटुंबातील अंजली मायदेव यांच्याशी  झाले आहे, त्यांना सुजात नावाचा एकुलता एक मुलगा आहे. सुजात आणि त्यांची पत्नी सामाजिक कार्यांत सक्रिय असतात.

◆ सुरुवातीचे जीवन आणि शिक्षण

         प्रकाश आंबेडकरांचा जन्म 10 मे 1954 रोजी मुंबई येथे झाला. त्यांचे नाव त्यांच्या आजोबांनी म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ठेवले. प्रकाश हे नाव ठेवण्यामागचे कारण म्हणजे, हाच प्रकाश सर्व समाजाला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणार असा त्यांचा विश्वास होता. 1972 मध्ये त्यांनी मुंबईतील सेंट स्टॅनीसलायस हायस्कूल मधून उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. 

      शाळेत असतांना त्यांची ओळख लपवण्यात आल्यामुळे त्यांना सामान्य विद्यार्थ्यांप्रमाणेच ट्रीट केले जात असत. 1978 मध्ये, त्यांनी सिद्धार्थ कॉलेज ऑफ आर्ट्समधून बॅचलर ऑफ आर्ट्स (बीए)ची पदवी प्राप्त केली आणि 1981 मध्ये त्यांनी मुंबईच्या सिद्धार्थ कॉलेज ऑफ लॉमध्ये बॅचलर ऑफ लॉ (एलएलबी)ची पदवी मिळवली. त्यांना डेअडलिफ्ट तसेच बॉक्सिंगचीही आवड होती.

◆ राजकीय कारकीर्द

       1988 मध्ये प्रकाश आंबेडकरांनी इतर आंबेडकरवादी संघटनांच्या सहकार्याने मुंबईत मोठ्या प्रमाणात निदर्शने केली तेव्हा आरपीआयला मोठे यश मिळाले. रामायणाचा नायक राम आणि महाभारताचा नायक कृष्ण या दोन दैवी व्यक्तीमत्वाची कठोर चिकित्सा करणाऱ्या डॉ. आंबेडकर यांच्या "रिडल्स इन हिंदुइझम" या इंग्रजी ग्रंथाने 1987-1988 च्या दरम्यान मोठे वादळ उठविले होते. 

       बाबासाहेब आंबेडकर यांच्या  या ग्रंथावर बंदी घालावी अशी मागणी शिवसेना व अन्य संघटनांनी केली होती. त्यानंतर या ग्रंथाच्या समर्थनार्थ आणि विरोधात मोर्चे-प्रतिमोर्चे, आंदोलने-प्रतिआंदोलने झाली होती. यासाठी सर्व दलित संघटनांना एकत्र आणण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी आंबेडकर विचार संवाद समिती (AVSS) ची स्थापना केली. 5 फेब्रुवारी 1988 रोजी प्रकाश आंबेडकर, आर.एस. गवई आणि इतर नेतृत्वाखाली  महाराष्ट्रातील विविध भागातून तसेच गुजरात आणि इतर राज्यांतून बाबासाहेब आंबेडकरांच्या चार ते पाच लाख अनुयायांनी मुंबईत आंदोलन केले. 

       या ग्रंथाने सामाजिक व राजकीय वातावरण ढवळून काढले होते. सामाजिक तणावही निर्माण झाला होता. मुंबईत झालेल्या आंदोलनामुळे काही दिवसांतच 10 फेब्रुवारी रोजी शिवसेनेचे प्रतिनिधी, मराठा महासंघ आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, दलित पँथर्सचे प्रतिनिधी तत्कालीन मुख्यमंत्री शंकराव चव्हाण यांनी एकत्रित बसून या ग्रंथात व्यक्त झालेल्या मताशी सरकार सहमत नाही, अशी टीप टाकण्याच्या तडजोडीवर हा वाद मिटवला.

       आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आरपीआयने नाशिक ते मुंबई महा मोर्चा काढला, त्यातील प्रमुख मुद्दा म्हणजे दलितांच्या वतन जमीन हस्तांतरित करणे. त्यास प्रतिसाद म्हणून सरकारने प्रकाश आंबेडकर यांच्यासमवेत सदस्य म्हणून एक समिती नेमली.

● भारिप बहुजन महासंघ

        4 जुलै 1994 रोजी प्रकाश आंबेडकरांनी भारिप बहुजन महासंघाची स्थापना केली. हा पक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा एक गट होता. त्यापूर्वी ते  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये कार्यरत होते. भारिप बहुजन महासंघाने अकोला नगरपालिका निवडणुकीत इंडियन नॅशनल कॉंग्रेस, शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यासारख्या प्रस्थापित राजकीय पक्षांवर विजय मिळविला. हे यश प्रकाश आंबेडकर यांनी आणलेल्या नवीन सामाजिक अभियांत्रिकीद्वारे शक्य झाले त्यालाच नंतर "अकोला पॅटर्न" म्हणून ओळखले गेले. 1995 नंतर पक्षाचा विस्तार सुरू झाला, काही दलितेतर ओबीसी पक्ष आणि इतर संघटना भारिप बहुजन महासंघामध्ये सामील झाल्या.

      प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात भारतीय रिपब्लिकन पार्टी आणि बहुजन महासंघ यांच्यातील युतीमुळे दलित आणि ओबीसींच्या एकत्रित आघाडीचे दर्शन घडले ज्यांची सांस्कृतिक ओळख मूलत: ब्राह्मणेतर नव्हती. बहुजन महासंघाच्या मते दलित आणि ओबीसी दोघेही ब्राह्मणवादी समाजव्यवस्थेमध्ये  सांस्कृतिकदृष्ट्या समान उत्पीडित दिसतात. बहुजन महासंघाने बौद्ध, शीख, जैन आणि मुस्लिम तसेच शुद्र (ओबीसी) आणि अति-शूद्र (दलित), आदिवासी, महिला, गरीब मराठा आणि गरीब ब्राह्मण जे जाती, वर्ग आणि लिंग शोषणाच्या अधीन गेले आहेत अशी बहुजन प्रवर्गाची व्याख्या केली होती.

          1990 ते 1996 दरम्यान आंबेडकर राज्यसभेचे खासदार होते. ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उमेदवार म्हणून 1998 मध्ये अकोला लोकसभा मतदारसंघातून 12 व्या लोकसभा निवडणुकीत निवडून गेले होते. 1999 मध्ये याच मतदारसंघातून दुसर्‍या वेळी ते 13 व्या लोकसभा निवडणुकीसाठी भारिप बहुजन महासंघाचे उमेदवार म्हणून निवडून आले आणि 2004 पर्यंत ते लोकसभेचे सदस्य होते. त्यांनी राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सदनात काम केले आहे.

     आंबेडकरांनी एकीकडे दलितांचे पुन्हा एकत्रिकरण करण्याचे धोरण अवलंबले आणि दुसर्‍या बाजूला इतर ओबीसी, आदिवासी, मुस्लिम अशा पक्षांशी युती करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या पाठिंब्यानेच त्यांनी दोनदा गैर-राखीव मतदार संघातून लोकसभेची निवडणूक लढविली. निवडून येण्यात यशस्वी नसले तरी त्यांनी दोन्ही प्रसंगी मोठ्या संख्येने मते मिळवली.

● महाराष्ट्र बंदची हाक

         कोरेगावच्या युद्धात लढलेल्या महार सैनिकांच्या स्मरणार्थ, त्यांचे वंशज (बौद्ध) दरवर्षी 1 जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथे "विजयस्तंभा"ला मानवंदना देण्यासाठी जात असतात. 1 जानेवारी 2018 रोजी, बौद्ध, तसेच काही हिंदू दलित, ओबीसी आणि शीख या लोकांवर हिंदुत्ववादी लोकांनी हिंसक हल्ला केला. प्रकाश आंबेडकर यांनी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांनी हिंदुत्ववादी लोकांची माथी भडकल्याचा आरोप केला आणि पोलिस तपास करून या दोघांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. परंतु महाराष्ट्र सरकार व राज्य पोलिसांनी दोषींवर कोणतीही कारवाई केली नाही म्हणून 3 जानेवारी 2018 रोजी त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला "महाराष्ट्र बंद"चे आव्हान केले. 

      महाराष्ट्र बंदच्या या आवाहनाला लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आणि बंदला यश आले. या बंदला मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार प्रतिसाद मिळाला. आंबेडकर यांच्या म्हणण्यानुसार  50%हून अधिक लोक महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी झाले होते. यापूर्वी फक्त शिवसेनेच्या बाळासाहेब ठाकरे यांच्यातच मुंबई बंद करण्याची ताकद होती. त्यानंतर प्रकाश आंबेडकरांची राजकीय शक्ती वाढली. ते आंबेडकरी आणि बहुजन समाजाच्या केंद्रस्थानी आले. विशेषतः तरुण वर्ग खूप आकर्षित झाला.

● वंचित बहुजन आघाडी

      प्रकाश आंबेडकर यांनी 20 मार्च 2018 रोजी वंचित बहुजन आघाडी या नवीन राजकीय पक्षाची स्थापना केली. या पक्षाची वैचारिक प्रणाली संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, समाजवादी, पुरोगामी असून समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांसोबत युती किंवा आघाडी आहे. यात जवळजवळ 100 लहान राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्था शामिल आहेत. वंचित बहुजन आघाडीला 15 मार्च 2019 रोजी राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली.

     14 मार्च 2019 रोजी आंबेडकरांनी घोषणा केली की भारिप बहुजन महासंघ वंचित बहुजन आघाडीमध्ये विलीन होईल. ते म्हणाले की, भारिपा-बहुजन महासंघाच्या सोशल इंजिनिअरिंगमुळे 'अकोला पॅटर्न' घडला असूनही, 'भारिपा' (आरपीआय) या शब्दामुळे पक्षाचा विस्तार मर्यादित झाला. 2019 च्या लोकसभा निवडणुकांनंतर भारिप-बहुजन महासंघ वंचित बहुजन आघाडीत विलीन झाले.

     शिवसेना-बीजेपी आणि राष्ट्रवादी-काँग्रेस यांच्या राजकारणाला कंटाळलेल्या महाराष्ट्राला प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून एक नवीन पर्याय उभा केला आहे.

प्रकाश आंबेडकर यांचा राजकिय प्रवास आवडल्यास नक्की शेयर करा...

✒️ आपल्या भाषेत मराठी भाषेत 🇮🇳